लोकसत्ता प्रतिनिधी

वसई : नायगाव पूर्वेच्या बापाणे परिसरात असलेल्या एका प्लायवूड कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास ही घटना घडली. दोन ते तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली. या आगीत कारखान्यातील साहित्य जळून खाक झाले आहे.

नायगाव पूर्वेच्या बापाणे येथे एम आर पी इंडस्ट्रियल इस्टेट आहे. यात प्लायवूड तयार करण्याचा कारखाना आहे.शुक्रवारी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास अचानक पणे आग लागली. या आगीच्या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली होती. याची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू केले होते. या कारखान्यात विविध प्रकारचे लाकडी साहित्य असल्याने आगीची तीव्रता अधिक वाढली होती. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

आणखी वाचा-पालिकेच्या पेल्हार प्रभाग समितीच्या कार्यालयाला आग

दोन ते तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली.या आगीत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसून प्लायवूड कारखान्यातील मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले आहे. नेमकी आग कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण ही अजून समजू शकले नाही. या आजूबाजूला नागरी वस्ती असल्याने घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Story img Loader