लोकसत्ता प्रतिनिधी
वसई : वसई पूर्वेच्या कामण येथील आयशा कंपाउंड भागात एका खेळणी तयार करणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. गुरूवारी दुपारी १ च्या सुमारास ही घटना घडली.मागील चार तासापासून अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.
वसई पूर्वेच्या कामण येथील आयशा कंपाउंड मध्ये खेळणी तयार करण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात विविध प्रकारची खेळणी तयार केली जातात. गुरुवारी दुपारी अचानकपणे या कारखान्यात आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली होती.
या घटनेची माहिती येथील नागरिकांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कारखान्यात खेळणी तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल व प्लास्टिक साहित्य असल्याने आगीची तीव्रता अधिक वाढली. हवेत आगीच्या धुराचे लोळ ही पसरले होते. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यास अडचणी निर्माण होत आहेत.
शॉट सर्किट झाल्याने ही आग लागली असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नसून कारखान्यातील लाखोंचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे. आग दुर्घटनेनंतर आजूबाजूच्या भागांतील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.