लोकसत्ता प्रतिनिधी

वसई : वसई पश्चिमेच्या दत्तानी मॉलच्या मागील बाजूस असलेल्या झोपड्यांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. यात ३० ते ३५ झोपड्या जळून खाक झाल्याने गोरगरिबांचे संसार उध्वस्त झाले आहेत.

वसई पश्चिमेच्या दत्तानी मॉलच्या मागील मोकळ्या जागेत मोल मजुरी करणारे बांधव झोपड्या बांधून राहत होते. शनिवारी रात्री अचानकपणे या झोपड्यांना आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती.

या आगीची माहिती स्थानिकांनी तातडीने वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. या आगीची माहिती मिळताच ताम तलाव येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र आगीची तीव्रता लक्षात घेता सनसिटी व नवघर अग्निशमन केंद्र येथूनही अग्निबंब दाखल होऊन तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या लागलेल्या आगीत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसली तरी या आगीत ३० ते ३५ झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. नेमकी आग कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण अजूनही कळू शकले नाही. तर दुसरीकडे ही आग लागली होती का की लावली होती असा प्रश्न ही उपस्थित केला जाऊ लागला आहे.

गोरगरिबांचे संसार उध्वस्त

वसई विरार मध्ये शेती वाडी यासह इतर कामाच्या शोधात पालघर जिल्ह्यासह विविध ठिकाणाहून नागरिक स्थलांतर करून येतात. मिळेल त्या मोकळ्या जागेत झोपड्या बांधून राहतात. हाताला मिळेल ते काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. मात्र या लागलेल्या आगीत ३० हुन अधिक झोपड्या जळून गेल्याने अनेक गरीब कुटुंबांच्या झोपड्यातील साहित्य जळून खाक होऊन नुकसान झाले आहे.