वसई: नालासोपारा पूर्वेच्या आचोळे परिसरात निवासी इमारतीत एका गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी रात्री नऊच्या सुमारास घडली असून पालिकेच्या अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. नालासोपारा पूर्वेच्या आचोळे साडी कंपाऊंड परिसरात एक रहिवासी इमारत आहे. त्या इमारतीत लग्न मंडप व डेकोरेशन साहित्य ठेवण्याचे गोदाम आहे. या गोदामात बुधवारी रात्री अचानकपणे भीषण आग लागली. आगीमुळे इमारत व आजूबाजूच्या परीसरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा >>> आमदार गीता जैनच्या भावाविरोधात आचारसंहिताभंगाचा गुन्हा; रिक्षाचालकांना भेटवस्तूचे वाटप

आगीचा भडका मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिक भयभीत झाले होते. या आगीची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळतात घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याशिवाय स्थानिक पोलीस ही घटनास्थळी पोहचले आहेत. इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे. नेमकी आग कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण अजून समजू शकले नाही. पोलीस व अग्निशमन दलाचे जवान परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम करीत आहेत.