वसई : नालासोपारा पूर्वेच्या भागात पालिकेच्या परिवहन सेवेच्या भंगार बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. या आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवून आग आटोक्यात आणली. महिनाभरात या भंगार बसला आग लागण्याची ही तिसरी घटना आहे.
नालासोपारा पूर्वेकडील सनशाइन येथे महापालिकेने भंगार झालेल्या परिवहन सेवेच्या बसेस ठेवण्यात आल्या आहेत. या भंगार बस कडे दुर्लक्ष झाले असल्याने या ठिकाणी गर्दुल्ले यांचा वावर अधिकच वाढला आहे. त्यामुळे सातत्याने या भागात बस ला आग लागण्याचे प्रकार समोर येत आहेत.
हेही वाचा…मिरा रोड गोळीबार प्रकरणाचा छडा; व्यावासायिक वादातून भावा-बहिणींनी केली हत्या
ग
रविवारी आठच्या सुमारास अचानकपणे या बसला आग लागल्याने खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती नागरिकांनी तात्काळ महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले. अवघ्या अर्ध्या तासांतच जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने या आगीत कोणतीच जीवितहानी झाली नसून यात भंगार बस यात जळून खाक झाली.
याआधी बसला दोन वेळा आग लागली होती. त्यानंतर पालिकेने याबसेस त्याच जागेत दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आल्या. मात्र तरीही आग लागण्याचे प्रकार थांबत नसल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. या बसेसकडे लक्ष दिले जात नसल्याने या ठिकाणी गर्दुल्ले ही धूम्रपान करण्यासाठी जात असतात त्यामुळे असा प्रकार घडला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा…मिरा रोड गोळीबार प्रकरण, पोलिसांची ७ पथके स्थापन
यापूर्वीच्या घटना
२४ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री आग लागली होती त्यात सहा भंगार बस जळाल्या होत्या.
२७ नोव्हेंबर २०२४ ,रोजी दुपारी तीनच्या सुमारास या भंगार वाहने ठेवलेल्या ठिकाणी बस ने पेट घेतला होता.