लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई : गाजलेल्या स्पॅनिश सीरीज मनी हाईस्टच्या धर्तीवर वसईतील मयंक ज्वेलर्स दुकानावर घालण्यात आलेल्या ७१ लाखांच्या दरोड्याचा उलगडा माणिकपूर आणि वालीव पोलिसांच्या गुन्हे शाखेने केला आहे. या प्रकरणी मास्टर माईडसह ५ जणांना अटक करण्यात आली आहे. दरोड्याचे नियोजन, पकडले जाऊ नये म्हणून घेतलेली खबरदारी, पर्याय म्हणून तयार ठेवलेला प्लॅन बी आदी सारं काही करण्यात आलं होतं. हा गुन्हा कधीच उघडकीस आला नसता. मात्र दुचाकीच्या हॉर्नच्या विशिष्ट आवाजाने चाणाक्ष पोलिसांचं लक्ष हेरलं आणि त्याच धाग्यावरून या टोळीचा उलगडा झाला.

१० जानेवारी २०२५ रोजी वसईच्या बाभोळा येथे असलेले मयंक ज्वेलर्स या सराफाच्या दुकानावावर दरोडा पडला होता. दोन अनोळखी व्यक्तींनी बंदुकीचा धाक दाखवत, कोयत्याने दुकानाचे मालक महेंद्र संघवी यांना मारहाण करत दुकानात असलेले ७१ लाखांचे दागिने लुटून नेले होते. माणिकपूर आणि वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने संयुक्तपणे तपास करून हा दरोडा घालणाऱ्या ५ जणांना अटक केली. त्यात रॉयल उर्फ रॉय एडव्हर्ड सिक्वेरा (४६) अनुज चौगुले (३६) या दोन मास्टरमाईंडसह सौरभ राक्षे (२७) सिताराम मोरे (५६) आणि अमर निमगोरे (२१) यांचा समावेश आहे. वसईच्या गिरीज गावात राहणारा रॉय याच्याविरोधात २० तर नालासोपार्‍यात राहणाऱ्या अनुज चौगुले याच्याविरोधात १२ गुन्हे दाखल आहेत. त्यांना मोक्का अंतर्गत अटकही करण्यात आली होती.

हॉर्नच्या आवाजाने पोलिसांना मिळाला सुगावा

या गुन्ह्याच्या तपासासाठी ६ पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस, तसेच गुन्हे शाखा काम करत होते. पोलिसांनी ६०० हून अधिक सीसीटीव्ही तपासले होते. आरोपी दुचाकीवरून गेले होते. मात्र त्यांचा काही माग लागत नव्हता. त्यामुळे गाडी गेली कुठे असा पोलिसांना प्रश्न पडला होता. दरम्यान, एका सीसीटीव्ही मध्ये गिरीजच्या टोकपाडा येथे एक दुचाकी एका घरावजळ हॉर्नचा विशिष्ट आवाज करत, दिवे बंद चालू करत थांबली. त्या नंतर घरातील इसम बाहेर आला आणि झटकन ते सर्व त्या घरात शिरले. हॉर्न अशाप्रकारे वाजवला जात नसल्याने पोलिसांना हा प्रकार संशयास्पद वाटला. हीच घटना या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी महत्वाची ठरली. त्यावरून पोलिसानी तपास सुरू केला.

ते घर रॉयल उर्फ रॉय एडव्हर्ड सिक्वेरा (४६) याचे होते. त्याची पोलिसांनी माहिती काढल्यावर तो सराईत गुन्हेगार असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी पुढील तपास करून इतर आरोपींना अटक केली. रॉय सिक्वेरा आणि अनुज चौगुले हे दोघे तुरूंगात होते. त्यांच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल होते. मागील वर्षी एप्रिल महिन्यात ते तुरूंगात सुटले होते, अशी माहिती परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त पूर्णिमा चौगुले- श्रींगी यांनी दिली.

मनी हाईस्टच्या धर्तीवर रचला कट…

२०२० मध्ये आलेली स्पॅनिश बेवसिरीज मनी हाईस्ट जगभर गाजली होती. या मालिकेतील प्रोफेसर टाकसाळ लुटण्याची योजना बनवतो. पकडले जाऊ नये यासाठी प्लॅन बी तयार ठेवतो, नवख्या लोकांना टोळीत सहभागी करून घेतो, योजना अमलात आणण्यासाठी बॅक अप टीम बनवतो. ज्वेलर्सला लुटणार्‍या टोळीचा मास्टर माईंड रॉयल सिक्वेरा याने अगदी त्या मनी हाईस्ट मधल्या प्रोफेसर प्रमाणे योजना बनवली. रॉय वसईत रहात असल्याने त्याने मयंक ज्वेवर्स या दुकानाची रेकी केली होती. हे दुकान निर्जन ठिकाणी आहे. दुकान रात्री ९ च्या सुमारास बंद होते, दुकानात सुरक्षा रक्षक नाही वगैरे गोष्टी त्यांच्या पथ्यावर पडल्या. दरोडा घालताना पकडले जाऊ नये यासाठी पुरेपूर काळजी घेण्यात आली होती, अशी माहिती माणिकूपर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सनिल पाटील यांनी दिली.

२ जानेवारीपासून आरोपींनी मोबाईलचा वापर बंद केला होता. प्रत्यक्ष भेटून ते योजना बनवत होते. सातारा येथे रहाणाऱ्या सीताराम मोरे याने या योजनेसाठी लागणारी बंदूक, कोयता दिला. तसेच दरोडा घालण्यासाठी लागणारी दुचाकी सातारा येथून चोरी करून आणून दिली. या चोरीसाठी कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तीची गरज होती. त्यासाठी सातारा येथील सौरभ राक्षे या तरुणाला घेण्यात आले.१० जानेवारीला अनुज आणि सौरक्ष यांनी दुकानात जाऊन बंदुक आणि कोयत्याच्या सहाय्याने दुकानातील ९४९ ग्रॅम वजनाचे सुमारे ७१ लाखांचे सोने लुटले. त्यावेळी रॉय गिरीज येथील घरात होता. त्यानंतर दोघे रॉयच्या घरी गेले. तेथे दागिन्याचे वजन केले. अमर निमगिरे हा या टोळीतील ५ वा सदस्य. याने सातारा येथे सोने वितळवून त्याच्या लगड तयार केल्या आणि तीन वेगवेगळ्या सोनारांना विकल्या. त्याचे त्यांना १९ लाख रुपये मिळाले. अनुज, रॉय आणि सौरभ यांनी प्रत्येकी ५ लाख रुपये तर सिताराम याला दिड लाख रुपये देण्यात आले.

कुणी कर्ज फेडले तर कुणी गाडी घेतली

या लुटीच्या पैशातून रॉय याने वसईतील एका फ्लॅटवर असलेले कर्ज फेडले. सौरभ याने ट्रकसाठी बहिणीच्या नावावर घेतलेले कर्ज फेडले. तर अनुज याने एक गाडी विकत घेतली होती.या टोळीने सातारा येथील एका सराफाच्या दुकानावर जुलै २०२४ मध्ये दरोडा घातला होता. हा गुन्हा आजवर उघडकीस आला नव्हता. हा गुन्हा देखील वसईच्या पोलिसांनी उघडकीस आणला आहे, अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी दिली.

परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्ता पौर्णिमा चौगुले-श्रींगी, वसईचे सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ घोगरे, माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिरालाल जाधव, वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे, पोलीस निरीक्षक बालाजी दहिफळे (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली माणिकपू आणि वालीव पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक सनिल पाटील, पोलीस हवालदार शैलैशपाटील, शामेश चंदनशिवे, धनंजय चौधरी, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, सतीश गांगुर्डे, बाळू कुटे, गोविंद लवटे, आनंदा गडदे, प्रवीण कांदे, विनायक राऊत, सचिन लांडगे, केतन गोडसे आदींच्या पथकाने ही कारावई केली.