वसई : कमाल नागरी जमीन धारणा (यूएलसी) घोटाळय़ाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावल्याने मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांची बुधवारी तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी संजय काटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, काटकर यांची दोन दिवसांपूर्वीच सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून डॉ. कैलाश शिंदे यांच्या जागी नियुक्ती केली होती. आता डॉ. शिंदे यांना पुन्हा सिडकोत नियुक्त करण्यात आले आहे.
मीरा भाईंदर शहरात मध्यंतरी यूएलसी घोटाळा उघडकीस आला होता. या प्रकरणात बुधवारी सकाळी आयुक्त दिलीप ढोले यांना सक्तवसुली संचालनालयाने कागदपत्रे मागितली. त्यापाठोपाठ सायंकाळी ढोले यांच्या जागी संजय काटकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे शासनाने जाहीर केले.
करोनाकाळात ढोले मीरा-भाईंदर महापालिकेत नियुक्त झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागील सरकारमध्ये रस्ते विकास महामंडळाचे मंत्रीपद असताना ढोले त्यांच्या खासगी सचिवांपैकी एक होते. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या महापालिकांमध्ये गणल्या जाणाऱ्या मीरा-भाईंदरचे थेट आयुक्तपद त्यांच्याकडे सोपविण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
सत्तावर्तुळाशी निकटचे संबंध असल्याने त्यांची या पदावर घट्ट मांड बसल्याचेही प्रशासकीय वर्तुळात बोलले जात होते. असे असताना त्यांची तडकाफडकी बदली झाल्याने या प्रकरणी वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. दिलीप ढोले यांना अद्याप नवीन नियुक्ती देण्यात आलेली नाही. २०२१ मध्ये दिलीप ढोले यांनी मीरा भाईंदर महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. तीन महिने ते त्या पदावर होते. त्यानंतर ३ मार्च २०२१ रोजी त्यांना महापालिकेत आयुक्त म्हणून बढती करण्यात आली होती. तेव्हापासून ते कार्यरत होते.
ढोले यांची बुधवारी चौकशी होऊ न शकल्याने, त्यांना पुन्हा समन्स बजावण्यात येणार असल्याचे समजते.
यूएलसी घोटाळा काय?
भाईंदर येथील पाच जमिनींच्या विकासासाठी बनावट व खोटय़ा यूएलसी प्रमाणपत्राचा वापर करून इमारती बांधून विकण्यात आल्या होत्या. या प्रकरणी तक्रार झाल्यावर २०१६ साली गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक करण्यात आली होती. बनावट यूएलसी प्रमाणपत्राद्वारे अधिकारी, विकासक व मध्यस्थांमार्फत शासनाला १०२ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. काही काळानंतर या गुन्ह्याचा तपास थांबला होता. दरम्यान, दिलीप ढोले यांच्या कार्यकाळात पोलिसांच्या ना हरकत दाखल्यानंतर एका विकासकाला परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे सक्तवसुली संचालनालयाने त्यांच्याकडे कागदपत्रे मागवली होती.
दोन दिवसांत नवा कार्यभार
ढोले यांच्या जागी काटकर यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले. त्यानंतर काटकर यांनी पालिकेत येऊन पदभार स्वीकारला. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असलेले काटकर यांनी दोन दिवसांपूर्वीच सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांनी डॉ. कैलाश शिंदे यांच्याकडून पदाची सूत्रे हाती घेतली होती. मात्र, आता डॉ. कैलाश शिंदे यांना पुन्हा सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदावर पाठवण्यात आले आहे.