भाईंदर : मिरा-भाईंदर शहरातील ऐतिहासिक घोडबंदर किल्ला भाडेत्वावर चालवण्यास देण्याचा वादग्रस्त निर्णय महालिकेने घेतला आहे. यासंदर्भात सुधारित ठराव अलिकडेच मंजूर करण्यात आला आहे. पालिकेने राज्य शासनाकडून हा किल्ला देखभालीसाठी आपल्या ताब्यात घेतला होता. मात्र आता तो थेट भाडत्वावर देण्याच्या निर्णयाने संताप व्यक्त होत आहे.
२०१९ मध्ये घोडबंदर किल्ला ‘महाराष्ट्र वैभव – राज्य संरक्षित स्मारक योजनें’तर्गत महापालिकेकडे देखभाल दुरुस्तीसाठी वर्ग करण्यात आला. पालिकेने पुरातत्त्व विभागाच्या मदतीने किल्ल्याच्या संवर्धनाचे काम हाती घेतले. आता हा किल्ला पालिकेने भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या वास्तूंना भाडेतत्त्वावर देऊन उत्पन्न मिळविण्याचा सुधारित ठराव पालिकेने ९ जुलै रोजी मंजुर करण्यात आला असून त्यात भाईंदर पश्चिम येथील क्रीडा संकुल, आप्पासाहेब धर्माधिकारी हॉल, मैदाने, उद्यानांबरोबरच घोडबंदर किल्ल्याचाही समावेश आहे. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूच्या अस्तित्वाला धोका निर्माण होण्याची भीती आहे.
हेही वाचा >>> भाईंदर : भाजप महिला जिल्हाध्यक्षाच्या भावावर गुन्हा दाखल, मिरा रोडमध्ये ५ लाखांची वीज चोरी
केवळ उत्पन्न मिळविण्यासाठी थेट किल्लाच भाड्याने देण्याच्या निर्णयावर टीका होत असून गडप्रेमी आंदोलनाच्या तयारीत आहेत. याबाबत विचारणा केली असता, केवळ किल्ल्यावरील रोषणाई कार्यक्रम व इतर गोष्टी भाडेतत्त्वावर देणार असल्याचे स्पष्टीकरण महापालिकेचे शहर अभियंता दीपक खांबित यांनी दिले. मात्र किल्ल्यावर अद्यापही महापालिकेकडून कोणताही रोषणाई कार्यक्रम व इतर कोणत्याही गोष्टीची उभारणी करण्यात आलेली नसून तसा कुठलाही ठराव करण्यात आलेला नाही. त्यामुळे हा निर्णय अंगलट आल्याने पालिका सारवासारव करत असल्याचे चित्र आहे.
शिवरायांकडून पाहणी
घोडबंदर किल्ल्याला पाचशे वर्षांचा इतिहास आहे. १५२०नंतर पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला. याच किल्याच्या बंदरावर अरब व्यापारी घोड्याचा व्यवसाय करत असत. १७३९ साली मराठ्यांनी वसईच्या मोहिमेत हा किल्ला जिंकला. बराच काळ किल्ल्यावर मराठ्यांचे साम्राज्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवरून परतताना किल्ल्याची पाहणी केल्याचा दावा इतिहासकार करतात.