भाईंदर : अडीच वर्षांपूर्वी मीरा रोड येथे ‘मियावाकी’ पद्धतीने उभारण्यात आलेल्या ३,२६७ झाडांची कत्तल करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे तरण तलाव उभारण्याचा निर्णय मीरा-भाईंदर महापालिकेने घेतला आहे. या संदर्भात पालिकेने सूचना प्रसृत केली असून, या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा >>> खासगी आस्थापनांची अग्निसुरक्षेकडे पाठ; केवळ ७४१ खासगी आस्थापनांचे अग्निसुरक्षा लेखापरिक्षण
मीरा रोड येथील बुद्धविहारालगत असलेल्या मोकळय़ा भूखंडावर पालिकेने अडीच वर्षांपूर्वीच ‘ग्रीन यात्रा’ या सामाजिक संस्थेच्या मदतीने ‘मियावाकी’ पद्धतीने झाडे लावली होती. हा भूखंड आरक्षण क्रमांक २३० म्हणून विकास आराखडय़ात उद्यानासाठी आरक्षित आहे. अडीच वर्षांत ही झाडे मोठी झाली असून, वेगवेगळय़ा प्रजातीची एकूण ३ हजार २६७ झाडे अस्तित्वात आहेत. त्यामुळे या भागात बऱ्यापैकी हरित पट्टा तयार झाला आहे. मात्र, आता या सर्व झाडांची कत्तल करून तिथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तरण तलाव तयार करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने वृक्ष प्राधिकरणाला पत्र पाठवून ही झाडे काढण्याची विनंती केली आहे. त्यानुसार पालिकेच्या उद्यान विभागाने २३ ऑक्टोबरला ही झाडे कापण्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध केली. यासंदर्भात नागरिकांना आक्षेप असल्यास हरकती-सूचना नोंदवण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यावर पालिकेचे वृक्ष प्राधिकरण विभागाचे प्रमुख पालिका आयुक्त संजय काटकर यांच्याकडे सुनावणी घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने विकास कामासाठी झाडे कापण्याची मागणी केली आहे. त्यानुसार याबाबत जाहीर सूचना प्रसिद्ध कारण्यात आली असून, त्यावर येणाऱ्या हरकती-सूचनांवर सुनावणी घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. कल्पिता पिंपळे, उपायुक्त, उद्यान विभाग