मुलींना गर्भपातासाठी बेकायदेशीररिच्या गर्भपाताच्या गोळ्या (एमटीपी किट) काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचे प्रकऱण समोर आले आहे. वालीव पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीवर गुन्हा दाखल केला असून गर्भपाताच्या गोळ्यांचा मोठा साठा जप्त केला आहे. या रॅकेट मध्ये डॉक्टर, औषध विक्रेते यांचा देखील सहभाग असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरातील खासगी डॉक्टर तसेच औषध विक्रेते (मेडिकल स्टोअर्स) मध्ये बेकायदेशीररित्या गर्भपाताच्या गोळ्यांची (एमटीपी किट) विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या संचात (किट) मध्ये ५ गोळ्या असतात. या गोळ्यांची किंमत अवघी ६० रुपये असते. मात्र काळ्या बाजारात या गोळ्या ५ ते १० हजार रुपयांना दिल्या जात असल्याचे उघडकीस आले आहे. वालील पोलिसांनी या प्रकरणी नालासोपाराच्या शिर्डी नगर येथे सापळा लावून अजित पांडे (४२) याला ताब्यात घेतले. औषध विक्रीचा कुठलाही परवाना त्याच्याकडे नव्हता. तरी या गोळ्या तो औषध विक्रेते आणि खासगी डॉक्टरांना विकत होता अशी माहिती तपासात समोर आली आहे. त्याच्याविरोधात औषध निरीक्षक किशोर रांजणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार औषध व सौंदर्य प्रसाधन कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आरोपीकडून अशा गोळ्यांचे ३०० संच जप्त कऱण्यात आले आहे. त्याची किंमत १ लाख ३० हजार एवढी आहे.

हेही वाचा >>> विरारमध्ये  २१ वर्षीय तरुण  तलावात बुडाला

या गोळ्या बनविणारी कंपनी पुण्यात आहे. तेथून त्या उत्तरप्रदेशात वितिरत केल्या जात होत्या. आरोपी पांडे हा तेथून गोळ्या आणून विक्री करत होता, अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे यांनी दिली. काही खासगी दवाखान्याती डॉक्टर्स वाटेल त्या किंमतीला गोळ्या विकत होते. या संचावर बारकोड असल्याने कुठे वितिरत केल्या गेल्या, कुणी विकल्या त्याची पाळेमुळे शोधून कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती राणे यांनी दिली.

हेही वाचा >>> वसईत पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसला भीषण आग, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घातक

शस्त्रक्रियेविना गर्भपात करण्यासाठी गर्भपाताच्या गोळ्या (एमटीपी किट) स्त्री रोग तज्ञांकडून दिल्या जातात. त्यासाठी आधी संबंधित महिलांची शारिरिक तपासणी केली जाते त्यानुसार या गोळ्यांची किती मात्रा (डोस) द्यायचा ते ठरवले जाते. डॉक्टरांच्या चिठ्ठी (प्रिस्किप्रशन) शिवाय या गोळ्यांची विक्री करणे बेकायदेशीर आहे. अशा गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतल्या तर जीवावर बेतू शकते, असे पालिक्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ भक्ती चौधरी यांनी सांगितले. शहरातील डॉक्टर्स अशा गोळ्यांची विक्री करत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असेही डॉ चौधरी यांनी सांगितले.

गर्भपात गोळ्यांची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याची माहिती मिळल्यानंतर आम्ही सापळा लावून ही कारवाई केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे – जयराज रणावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव बदनामी होऊ नये म्हणून मुली बेकायदेशीर मार्गाने मिळालेल्या गर्भपाताच्या गोळ्या घेतात. परंतु हे धोकादायक आहे. मुलींनी स्त्रीरोगतज्ञांकडून तपासणी करून गोळ्या घ्याव्यात. डॉक्टरांकडे रुग्णांची गोपनियता राखली जाते. – डॉ भक्ती चौधरी, मुख्य आरोग्य अधिकारी, वसई विरार महापालिका

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Medical stores and private doctors selling abortion pills illegally in vasai zws