लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
वसई : वसई विरार महापालिका मुख्यालयात अधिकारी उपस्थित नसल्याने नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आता भेटीसाठी दोन दिवस निश्चित करण्यात आले आहे. आठवड्याच्या दर मंगळवार आणि बुधवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत अधिकारी नागरिकांना भेटण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत. आस्थापना विभागाने गुरूवारी या संदर्भातील परिपतत्रक काढले आहे.
विविध कामांसाठी नागरिक महापालिका मुख्यालयात अधिकार्यांना भेटण्यासाठी येत असतात. मात्र अधिकारी जागेवर नसल्याने नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. अनेकदा अधिकारी बैठकीसाठी, कामाची पाहणी करण्यासाठी किंवा मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालयात जात असतात. नागरिकांना त्याची माहिती नसते. अधिकाऱ्यांची वाट बघण्यात वेळ जातो आणि अधिकारी न भेटल्याने रिकाम्या हाताने परतावे लागते. यासाठी आयुक्तांनी परिपत्रक काढले आहे त्यानुसार आता प्रत्येक अधिकारी दर आठवड्याच्या मंगळवार आणि बुधवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत नागरिकांना भेटणे अनिवार्य करण्यात आले आहे. भेटीसाठी आलेल्या नागरिकांची नोंद रजिस्टर मध्ये करण्याची सूचना देण्यात आली आहे. यामुळे किती अभ्यागत येतात ते पुन्हा पुन्हा येतात का याची देखील नोंद ठेवता येणार आहे. भेटीसाठी दोन दिवस निश्चित केल्याने नागरिकांना निश्चित दिवशी अधिकार्यांना भेटता येईल आणि त्यांचा वेळ वाचेल, असे पालिकेचा उपायुक्त (आस्थापना) सदानंद पुरव यांनी सांगितले.
कार्यालयीन वेळेतील टाईमपास बंद करा
अनेक प्रभागातील कर्मचारी, अधिकारी, रुग्णालयातील डॉक्टर्स विविध कामांसाठी महापालिका मुख्यालयात येत असतात. त्यांची वैयक्तिक कामे करण्यासाठी ते आस्थापना विभागात येतात. त्यानावाखाली ते बाहेर रेंगाळून टाईमपास करत असतात. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय होत असते. यासाठी सर्व कर्मचारी, लिपिक, अधिकारी यांनी खासगी कामांसाठी कार्यालयानी वेळेत मुख्यालयात येऊ नये तसेच या कामासाठी संध्याकाळी साडेसहा नंतर आस्थापना विभागात यावे, असेही परिपत्रक काढले जाणार आहे.
उपायुक्त दर शुक्रवारी प्रभागात
वसई विरार महापालिका क्षेत्रात एकूण ९ प्रभाग आहेत. प्रशासकीय सोयीसाठी प्रभागांची परिमंडळात विभागणी करून पालिकेतील उपायुक्तांना परिमंडळ उपायुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. रिमंडळातील उपायुक्तांनी दर शुक्रवारी प्रभाग समिती कार्यालयात जाऊन नागरिकांना भेटून तक्रारी सोडविण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. पालिकेतील अधिकारी कोण हे नागरिकांना ओळखता यावे यासाठी प्रत्येक अधिकार्याने गळ्यात ओळखपत्र घालण्याचेही बंधनकारक करण्यात आले आहे.