वसई – रिक्षात बसलेल्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला निर्जनस्थळी नेऊन एका रिक्षाचालकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना नायगाव मध्ये घडली आहे. माणिकपूर पोलिसांनी या रिक्षाचालकाची ओळख पटवली असून त्याच्या शोधासाठी पथके तयार केली आहेत. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
पीडित मुलगी १६ वर्षांची असून नायगाव मध्ये राहते. शुक्रवारी ती आई बरोबर खरेदीसाठी गेली होती. खरेदी झाल्यानंतर ते दोघे नायगाव स्थानकात आले. आईने काम असल्याने पीडित मुलगी एकटीच घरी जाण्यासाठी निघाली. नायगाव स्थानकाच्या पश्चिमेला उतरून तिने घरी जाण्यासाठई रिक्षा केली. संध्याकाळी ६ च्या सुमारास ती रिक्षात बसली होती. ती रिक्षात एकटीच होती. रिक्षाचालकाने रिक्षा अन्य ठिकाणी वळवली. नेहमीचा रस्ता नसल्याने मुलीला संशय आल्यावर रिक्षाचालकाने उडवाउडवीची उत्तरं दिली. यानंतर त्याने उमेळमान येथील मिठागराच्या निर्जन जागेवर त्याने रिक्षात बिघाड झाल्याचे कारण देत थांबवली. यानंतर मागील बाजूस येऊन त्याने अंधाराचा फायदा घेत पीडित मुलीचा विनयभंग केला. या घटनेमुळे पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती. तिने घरी जाऊन आईला हा प्रकार सांगितला. याप्रकरणी तिच्या पालकांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी रिक्षाचालकाची ओळख पटवली असून त्याचे नाव प्रकाश वर्तक असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याविरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७५(१) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोक्सो) अधिनियमाच्या कलम १, १२ अन्यवे गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा >>>नाताळ, नववर्षच्या मेजवान्यांन्याची तयारी सुरू, खासगी शेफच्या मागणीत वाढ
आरोपीच्या अटकेसाठी पथक
या प्रकारामुळे नायगाव मध्ये संतापाची लाट पसरली आहे. रिक्षाचालकांकडूनच प्रवासी म्हणून बसलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे रिक्षा चालकाची ओळख पटवली आहे. मात्र रिक्षाचालक प्रकाश वर्तक फरार झाला आहे. आम्ही आरोपी रिक्षाचालकाची रिक्षा जप्त केली आहे. तो फरार असून त्याच्या शोधासाठी पथक तयार केल्याची माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश वळवी यांनी दिली. लवकरच आरोपी रिक्षाचालकाला गजाआड केले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.