वसई– विरार मध्ये एका रिक्षाचालकाकडून भर रस्त्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. अर्नाळा सागरी पोलीस याप्रकरणी रिक्षाचालकाचा शोघ घेत आहे. रिक्षाचालकाकडून तरुणींचा विनयभंग होण्याची ही महिन्याभरातील दुसरी घटना आहे
पीडित मुलगी १७ वर्षांची असून विरारला राहते. शनिवारी तिने महाविद्यालयात जाण्यासाठी एका ॲपवरून ऑनलाईन रिक्षा बुक केली होती. या मुलीला आरोपी रिक्षाचालकाने विरार पश्चिमेच्या विवा महाविद्यालयाजवळील डिमार्ट दुकाना जवळ सोडलं. मात्र जाताना त्याने रिक्षात या मुलीचा विनयभंग केला. या मुलीने नंतर अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाविरोधात विनयभंग आणि बालकांचे लैंगिक अत्याचारविरोधी कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची आहे. रिक्षा ऑनलाईन बुक केल्याने त्याचा राईडर आयडी या मुलीकडे होता. त्यावरून त्याचा माग काढत असून लवकरच त्याला अटक केली जाईल अशी माहिती या प्रकरणाचा तपास करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक दळवी यांनी दिली.
मागील महिन्यात देखील ६ ऑगस्ट रोजी वसईत २८ वर्षीय तरुणीचा रिक्षाचालकाने धावत्या रिक्षात विनयभंग केला होता. याप्रकऱणी माणिकपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या रिक्षाचालकाचा देखील शोध सुरू आहे.