लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई : वसईच्या सातिवली येथील कंपनीत काम करणार्‍या १६ वर्षीय मुलीवर कंपनी मालकाने सलग दोन दिवस बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी कंपनीच्या कार्यालयात आणि गच्चीवर ही घटना घडली. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

पीडित मुलगी १६ वर्षांची असून वसई पूर्वेच्या सातिवली येथील एका ऑफसेट प्रिंटीग कंपनीत काम करते. ३१ डिसेंबर रोजी कंपनीचा मालक प्रदीप प्रजापती (५०) याने पीडित मुलीला तिच्या विरोधात तक्रार आहे असे सांगितले. त्यावर तोडगा काढण्याचे कारण सांगून कार्यालयात बोलावले आणि दुपारी साडेतीनच्या सुमारास तिच्यावर कार्यालयात बलात्कार केला. या प्रकरणाने पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती. तरी दुसर्‍या दिवशी म्हणजे १ जानेवारी रोजी ती कामावर आली. संध्याकाळी सर्व कर्मचारी घरी गेल्यावर प्रजापती याने तिला मोठ्या सेठना तुला भेटायचे आहे असे सांगून थांबवून ठेवले. त्यानंतर तिला कंपनीच्या गच्चीवर नेले आणि पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. अखेर पीडित मुलीने वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

आणखी वाचा- शहरबात : भटक्या श्वानांची दहशत

याबाबत वालीव पोलीस ठाण्यात आरोपी प्रदीप प्रजापती याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४, ६५(१) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) च्या कलम ४, ८, १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी आमच्याकडे घटना घडल्यानंतर आली होती. मात्र कंपनी बंद होती. आरोपी निष्पन्न झाला असून लवकरच त्याला अटक केली जाईल, अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे यांनी दिली.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minor girl raped for two consecutive days case registered against company owner mrj