भाईंदर : मिरा -भाईंदर महानगरपालिकेचे उपायुक्त रवी पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे बनावट अश्लील छायाचित्र तयार करून ते प्रसिद्ध करण्याची भीती दाखवत एका इसमाने चक्क पाच लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भाईंदर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मिरा भाईंदर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची जबाबदारी ही उपायुक्त रवी पवार सांभाळत आहेत. मागील काही दिवसांपासून प्रशासनाने शहरातील अतिक्रमण विरोधी कारवाईला जोर दिल्यामुळे अनेक तक्रारदार हे पवार यांना संपर्क साधत आहेत. तर यातील काही जण हे विरोध म्हणून पवार यांचा द्वेष देखील करत आहे.

हेही वाचा : वसई: महामार्गावर सातीवली खिंडीत केबल वाहतूक ट्रेलर उलटला, अपघातात चालक जखमी; महामार्गावर वाहतूक कोंडी

दरम्यान यातील एका इसमाने पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे मोबाईलच्या मदतीने बनावट अश्लील छायाचित्र तयार करून त्यांना विविध माध्यमांमार्फत पाठवण्यास सुरुवात केली आहे. इतकेच नवे तर हे छायाचित्र समाज माध्यमांवर टाकून बदनामी करणार असल्याचा मजकूर व्हाट्सअॅप तसेच महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर पाठवण्यात आला आहे. याशिवाय ही बदनामी थांबवायची असल्यास थेट पाच लाख रुपये द्यावे, अशी खंडणी मागणारा व्हाट्सअॅप दूरध्वनी नुकताच पवार यांना आला आहे.

हेही वाचा : भाईंदरच्या उत्तन येथील घटना, खड्ड्यात बुडून ६ वर्षीय मुलाचा मृत्यू

त्यामुळे संबंधित प्रकरणाची लेखी तक्रार पवार यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरून सोमवारी रात्री अनोळखी इसमाविरोधात खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच खंडणी मागण्यासाठी वापरण्यात आलेल्या दूरध्वनी क्रमांकाचा व ई-मेल आयडीचा तांत्रिकदृष्ट्या तपास करून आरोपीचा शोध सुरू केला असल्याची माहिती तपास अधिकारी सुधीर गवळी यांनी दिली आहे.तर एका तक्रारदारावर मला दाट संशय असून लवकरच पोलीस तपासात तो समोर आल्यानंतर त्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी मी प्रयत्न करीन अशी प्रतिक्रिया उपायुक्त रवी पवार यांनी दिली आहे.