वसई : मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या क्युआर-आधारित डिजिटल कचरा व्यवस्थापन प्रणालीला प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार २०२५ (भारताचा स्वतंत्र आणि प्रामाणिक सर्वोच्च सन्मान) रौप्य पुरस्कार जाहीर झाला आहे. शनिवारी नवी दिल्ली हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मिरा भाईंदर महानगरपालिकेने स्वच्छ भारत अभियानाच्या उद्दिष्टांशी सुसंगत राहून कचरा संकलन आणि वर्गीकरणासाठी क्युआर-आधारित प्रणाली विकसित केली. या प्रणालीमुळे कचरा संकलन अधिक प्रभावी, नियोजित आणि पारदर्शक झाले आहे. तसेच, नागरिकांच्या तक्रारी कमी झाल्या असून शहर अधिक स्वच्छ आणि सुंदर राहण्यास मदत झाली आहे. या नावीन्यपूर्ण प्रणालीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत स्कॉच ग्रुपने या उपक्रमाला गौरविले आहे. स्कॉच पुरस्कार सार्वजनिक प्रशासन, गुड गव्हर्नन्स आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरासाठी दिला जाणारा देशातील सर्वोच्च पुरस्कार आहे. शनिवारी नवी दिल्ली येथील पुरस्कार वितरण सोहळ्यात मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.), अतिरिक्त आयुक्त डॉ. सचिन बांगर, शहर अभियंता दिपक खांबित यांनी स्विकारला.

हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर आयुक्त शर्मा यांनी संपूर्ण महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. हा पुरस्कार संपूर्ण मिरा भाईंदर शहरासाठी अभिमानास्पद आहे. भविष्यात आणखी नवीन कल्पक उपक्रम राबवून मिरा भाईंदरला देशातील सर्वात स्वच्छ शहरांमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील राहील, असे त्यांनी सांगितले. महानगरपालिका प्रशासनाने हा पुरस्कार शहरातील नागरिकांना समर्पित केला असून, भविष्यात कचरा व्यवस्थापन, स्वच्छता आणि पर्यावरणपूरक उपक्रम अधिक मजबूत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हा पुरस्कार मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या उत्तम प्रशासकीय कार्यपद्धती आणि नवकल्पनांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरेल.

या पुरस्कार सोहळ्यात, डॉ. एम. गोविंदा राव (अध्यक्ष, कर्नाटक क्षेत्रीय असमतोल निवारण समिती), अजय सेठ (सचिव, अर्थ व्यवहार विभाग, वित्त मंत्रालय), प्रांजुल भांडारी (एमडी आणि चीफ इंडिया इकॉनॉमिस्ट, एचएसबीसी आणि सल्लागार, १६व्या वित्त आयोग), डॉ. एम. रामचंद्रन (प्रख्यात फेलो, स्कॉच डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि माजी सचिव, भारत सरकार), डॉ. एन. सी. सक्सेना (प्रख्यात फेलो, स्कॉच डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि माजी सचिव, भारत सरकार), समीर कोचर (अध्यक्ष, स्कॉच ग्रुप), डॉ. व्ही. एन. आलोक (प्राध्यापक, भारतीय लोक प्रशासन संस्था), डॉ. दीपक बी. फाटक (संचालक, स्कॉच डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि आयआयटी इंदूरचे बोर्ड ऑफ गव्हर्नर्स अध्यक्ष), डॉ. राम सिंग (संचालक, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स) आणि डॉ.हिंदोल सेनगुप्ता (इतिहासकार आणि प्राध्यापक, ओ. पी. जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटी) उपस्थित होते.

काय आहे क्युआर डिजिटल कचरा व्यवस्थापन प्रणाली?

क्युआर-आधारित डिजिटल कचरा व्यवस्थापन प्रणाली ही कचरा संकलनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कचऱ्याच्या डब्यांना किंवा पिशव्यांना दिलेले क्विक रिस्पॉन्स कोड वापरते. हे क्युआर-कोड स्मार्टफोन किंवा विशेष उपकरणांद्वारे स्कॅन करून, महानगरपालिका आणि संबंधित यंत्रणांना घरगुती व व्यावसायिक कचरा व्यवस्थापनाचा मागोवा घेता येतो, ज्यामुळे कचरा वेळेवर उचलला जातो आणि त्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण केले जाते. हा आयटी-आधारित शाश्वत मॉडेल कार्यक्षमतेत सुधारणा करतो, पारदर्शकता वाढवतो आणि नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक जबाबदारी निर्माण करतो. या प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे शहरात स्वच्छता सुधारते, अवैधरीत्या कचरा टाकण्याच्या घटना कमी होतात, कचरा संकलन मार्ग अधिक कार्यक्षम होतात आणि नागरिकांना सुयोग्य कचरा विल्हेवाट लावण्यासाठी प्रेरणा मिळते.