वसई : मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पहिल्या टप्प्यात ९४५ पोलीस पदांची भरती केल्यानंतर आता दुसर्‍या टप्प्यात १ हजार ८२ पदे भरली जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठिवण्यात आला आहे. पालघर जिल्हा आणि ठाणे ग्रामीण पोलिसांचे विभाजन करून १ ऑक्टोबर २०२० रोजी ‘मिरा भाईंदर वसई विरार’ पोलीस आयुक्तालयाची स्थापना करण्यात होती. पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाली तेव्हा ३ हजार ३३१ पदांना मंजुरी देण्यात आली होती. त्यात ४२६ अधिकारी आणि २ हजार ९०५ पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश होता. परंतु २७२ पोलीस अधिकारी आणि १ हजार ३९८ असे मिळून १ हजार ६७० पोलिसांच्या जागा रिक्त होत्या.

अधिकार्‍यांची १३ टक्के तर कर्मचार्‍यांची ३६ टक्के पदे अद्यापही रिक्त होती. कर्मचार्‍यांची पदे भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. २०१३ मध्ये ९९६ पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात आली आणि नुकचे ९४५ पोलीस प्रशिक्षणानंतर विविध पोलीस ठाण्यात रूजू झाले आहेत. आता दुसर्‍या टप्प्यातील १ हजार ८२ पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला असून त्याच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.

हेही वाचा : कुख्यात टोळीतील ६ जणांविरोधत मोक्का अंतर्गत गुन्हे

आम्ही मागील वर्षी टप्पा एक मध्ये ९९६ पोलीस पदांच्या भरतीची प्रक्रिया राबवली होती. आता दुसर्‍या टप्प्यात १ हजार ८२ पदांची आवश्यकता असून तसा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळेल असे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी सांगितले. भरती प्रक्रियेचा अध्यादेश लवकर काढावा यासाठी पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी खासदार राजेंद्र गावित यांच्याकडे विनंती केली आहे. त्यानुसार मी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे, असे खासदार गावित यांनी सांगितले.

हेही वाचा : रेल्वे मार्गिकेचे भूसंपादन वादात; नव्याने सर्वेक्षण करण्याची ग्रामस्थांची मागणी

आयुक्तालयातील रिक्त २३१ पदांसाठी भरती

दरम्यान, राज्य शासनाने राज्यातील साडेतीन हजार पोलीस पदांची भरती काढली आहे. त्या अंतर्गत मिरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयात शिपायांची रिक्त असलेली २३१ पदे भरली जाणार आहेत. उमेदवार ऑनलाईन पद्धतीने ३१ मार्च २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

Story img Loader