लोकसत्ता वार्ताहर

भाईंदर : गेल्या सव्वा महिन्यांपासून फरार असणारे मिरा भाईंदर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष मोहन पाटील यांना शुक्रवारी मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली आहे. अटकपूर्व जामिन फेटाळल्यानंतर अटक करण्यात आली आहे. मोहन पाटील यांना ८ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे

भाईंदर पूर्व येथील अभिनव शेतकरी शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्षपदी असताना मोहन पाटील यांनी कोट्यावधी रुपयांचे आर्थिक फेरफार केल्याचे त्यावर संस्थेतील सदस्यांनी आरोप केले होते. शाळेतील विद्यार्थांना दिल्या जाणारी खिचडी आणि ओळखपत्र वाटप तसेच संगणक खरेदीती मधील घोटाळ्याचा समावेश आहे. या प्रकरणावरून संस्थेतील दोन गटात न्यायालयीन लढाई देखील सुरु आहे. दरम्यान यातील एका प्रकरणात मोहन पाटील यांच्या विरोधात २०१८ साली नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो तपास नंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.

आणखी वाचा-तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण

या प्रकरणात अटकेपासून संरक्षण मिळावे म्हणून पाटील यांनी २४ फेब्रुवारी २०२४ रोजी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र ही मागणी न्यायालने फेटाळल्यानंतर ते फरार झाले होते. अखेर शुक्रवारी पहाटे पाटील यांना पोलिसानी अटक केली आहे. तर हा वाद चर्चेत असतानाच चार महिन्यापूर्वी राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) पक्षाने त्यांची जिल्हा अध्यक्षपदी निवड केली होती.