वसई : निवडणूक प्रचारासाठी फारच कमी वेळ उरल्याने नेत्यांची धावपळ होत आहे. त्यामुळे प्रचाराला प्रत्यक्ष उपस्थित राहता येत नाही. यासाठी भाजपनेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चित्रफितीचा आधार घेतला आहे. मिरा भाईंदरचे भाजप उमेदवार नरेंद्र मेहता यांच्यासाठी त्यांनी चित्रफित तयार करून समाजमाध्यमावर प्रसारीत केली आहे. या चित्रफितीच्या आधारे भाईंदर मध्ये प्रचार केला जात आहे.
या निवडणुकीत भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठी मागणी आहे. परंतु त्यांना सर्व ठिकाणी जाणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांनी चित्रफित तयार करून समाजमाध्यमावर प्रसारीत करण्यास सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी मिरा भाईंदर मधील भाजप उमेदवार नरेंद्र मेहता यांच्यासाठी चित्रफित तयार केली आहे. मिरा-भाईंदरचा चेहरा मागील दहा वर्षात बदलला आहे. मेट्रो, पिण्याच्या पाण्याची योजना व इतर अनेक प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यामुळे एक प्रकारे शहराचा सर्वांगीण विकास गतीने होत असल्याचे फडवणीस यांनी सांगितले. या विकासाच्या वाटचालीत माझ्याकडे सातत्याने विकास कामांची मागणी आणि पाठपुरा करणारे नरेंद्र मेहता हे एकमात्र आहेत, अशा शब्दात फडणवीस यांनी कौतुक केले. मिरा-भाईंदरकरांनी पुन्हा एकदा नरेंद्र मेहतांना आशीर्वाद द्यावा. मेहतांच्या माध्यमातून सुरू झालेली विकास कामांची मालिका पूर्ण करून आम्ही मिरा-भाईंदर ला सुंदर शहर तयार करून दाखवू, असा दावा त्यांनी केला आहे.
हेही वाचा : Rajnath Singh: “डॉ. आंबेडकरांना भारतरत्न नरेंद्र मोदींनी दिला”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा दावा
मिरा भाईंदर मतदारसंघातून महायुतीतर्फे नरेंद्र मेहता तर महाविकास आघाडीतर्फे कॉंग्रेसचे मुझफ्फर हुसेन निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर विद्यमान आमदार गीता जैन यांना भाजपाने तिकिट नाकारल्याने त्या अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. या तिहेरी लढतीमुळे हा मतदारसंघ अत्यंत चुरशीचा बनला आहे.