भाईंदर : आगामी विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मेहता हेच आमचे उमेदवार असल्याची घोषणा कार्यकर्ता मेळाव्यात भाजप कार्यकर्त्यांनी एकमतांनी केली. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत वाद पुन्हा पेटून उठण्याची शक्यता आहे.
मिरा भाईंदर भाजप पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन बुधवारी जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांनी मिरा रोड येथील एस के स्टोन मैदानात केले होते.या प्रसंगी भाजप पदाधिकारी, माजी नगरसेवक व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थिती होते. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. शिवाय मागील निवडणुकीतील पराभवाचे चिंतन करण्यात आहे.
हेही वाचा…Video: भाईंदरमध्ये ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी
त्यानंतर आगामी निवडणूक ही पूर्ण ताकतीने लढण्याचा निर्णय घेण्यात आला. महत्वाची बाब म्हणजे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनाच निवडणुकीचा उमेदवार घोषित करत कार्यकर्त्यांनी आपले समर्थन जाहीर केले.
मात्र मेहता यांच्या नावाची घोषणा झाल्यामुळे भाजप मधील वाद पेटून उठण्याची शक्यता आहे. कारण मागील निवडणुकीत भाजप मधून बंडखोरी करत मेहता यांचा पराभव करणाऱ्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी देखील यंदा भाजप पक्षातूनच या जागेवर आपला दावा केला आहे. तर माजी जिल्हाध्यक्ष रवी व्यास यांनी पक्षात स्वतंत्र गट तयार करून मेहता यांना जाहीर आव्हान दिले आहे.त्यामुळे वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा…नालासोपार्याच्या शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरण, एसआयटी चौकशी करण्याची मागणी
“मी भाजप पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. माझ्यावर अनेक संकटे आले तरी देखील मी पक्षाचा हात कधी सोडला नाही. तसेच या शहराला मी अत्यंत जवळून पाहत आलो आहे. म्हणून ही निवडणुकी माझ्यासाठी नाही तेथील जनतेसाठी लढणार आहे.” – नरेंद्र मेहता – माजी भाजप आमदार