म्हाडा घरकुल प्रकल्पाकरिता पाणी पुरवण्याच्या निर्णयाला केराची टोपली

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात उभारण्यात आलेल्या म्हाडा घरकुल प्रकल्पांकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दीड दशलक्ष लिटर पाणी देण्याचा करार करण्यात आला होता. मात्र याकरिता आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आल्यानंतरदेखील मीरा-भाईंदर शहराला पाणी मिळत नसल्याने पालिका प्रशासन हतबल झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मीरा-भाईंदर शहरात मीरा रोड येथे म्हाडा घरकुल प्रकल्प योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत अनेक उंच इमारती तयार करण्यात आल्या असून या इमारतींना आवश्यक पाण्याची पूर्तता बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून करण्याचा करार करण्यात आला होता. यात प्रति दिवस सुमारे दीड दशलक्ष लिटर पाणी देण्यात येणार होते. याकरिता मीरा-भाईंदर महापालिकेडून आवश्यक नळजोडणी आणि इतर बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. तसेच दहिसर टोलनाका परिसराजवळ सुमारे ४ लाख ३४० रुपये खर्च करून जलमापकदेखील उभारण्यात आले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे मुंबईच्या थकीत वसुलीबाबत मीरा-भाईंदर महानगरपालिकेचा कोणताही संबंध नसताना येथील पालिका प्रशासनाने बृहन्मुंबई महानगरपालिकेला करवसुली करून दिली. तसेच तब्बल १० लाख  ६४ हजार रुपये मीरा-भाईंदर पालिकेने अदा केले

आहे. मात्र तरीदेखील अद्यापही मीरा-भाईंदर शहराला पाणीपुरवठा करण्यात येत नसल्यामुळे पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे, तर हे मीरा-भाईंदर शहराला तात्काळ पाणी मिळाल्यास शहरातील काही भागांत उद्भवत असलेली पाण्याची समस्या दूर होणार असल्याची माहिती प्रशासनकडून देण्यात आली आहे.

याकरिता आवश्यक सर्व गोष्टींची पूर्तता मीरा-भाईंदर प्रशासनाकडून करण्यात आली असून आता केवळ पाणी मिळण्याकरिता आम्ही बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे.

– शरद नानेगावकर, उपअभियंता (पाणीपुरवठा विभाग)

मीरा-भाईंदर महानगरपालिकेला ठरल्याप्रमाणे म्हाडा घरकुल प्रकल्पाचे पाणी मिळाल्यास साधारण महिन्याला ४५ दशलक्ष लिटर पाण्याची वाढ होईल. त्यामुळे हे पाणी तात्काळ मिळण्याकरिता मी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना पत्र पाठवले आहे.

– ज्योस्त्ना हसनाळे, महापौर (मीरा-भाईंदर महानगरपालिका)

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mira bhayandar did not get water mumbai ssh
Show comments