भाईंदर :– दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेतील उत्तन, डोंगरी येथील कारशेडच्या कामासाठी ९ हजार ९०० झाडांवर कुऱ्हाड फिरवली जाणार आहे. या झाडांची कत्तल करण्यास पर्यावरणप्रेमींनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या संदर्भातील सुनावणी प्रक्रियेत शंभरहून अधिक जणांनी आक्षेप नोंदला असून पालिका मुख्यालयात आंदोलन केले आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) मेट्रो ९ मार्गिका बांधली जात आहे. या मार्गिकेसाठी भाईंदरमधील राई, मुर्धा, मोर्वा येथे कारशेड प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र तेथे कारशेड बांधण्यास नागरिकांनी विरोध केल्याने राज्य सरकारला कारशेडची जागा बदलावी लागली. त्यानुसार उत्तन, डोंगरी येथे कारशेड बांधण्याचा निर्णय घेऊन राज्य सरकारने कारशेडच्या बांधकामास मंजुरी दिली. त्यानंतर ५९.६५ हेक्टर जागेवर कारशेडचे बांधकाम करण्याच्यासाठी एमएमआरडीए कामाला लागले.

त्यानुसार कारशेडच्या कामासाठी डोंगरीतील झाडे कापावी लागणार असल्याने एमएमआरडीएने ११ हजार ३०६ झाडांवर कुऱ्हाड फिरवणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील १ हजार ४०६ झाडे ही यापूर्वीच कापण्यात आली असून ९ हजार ९०० झाडे कापण्याबाबत ची सूचना मिरा भाईंदर महापालिकेने १२ मार्च रोजी प्रसिद्ध केली होती.

झाडे कापण्याच्या निर्णयाविरोधात शंभर हुन अधिक जणांनी हरकत नोंदवली होती. त्यामुळे महापालिका मुख्यालयात उद्यान विभागाच्या उपायुक्त कल्पिता पिंपळे यांच्या उपस्थितीत सुनावणी प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. यावेळी पर्यावरण प्रेमींनी हातात फलक घेऊन झाडे तोंडण्यास विरोध केला तर येत्या दिवसात नोंदवण्यात आलेल्या हरकतींचा अभ्यास करून पुढे निर्णय घेणार असल्याचे पिंपळे यांनी जाहीर केले.

आंदोलनकरांचे मत काय ?

उत्तन येथे उभारण्यात येणाऱ्या मेट्रो कारशेडला पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे. या कारशेडसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झाल्यास त्याचा वाईट परिणाम शहराच्या पर्यावरणीय तसेच स्थानिक जनजीवनावर होणार आहे. यात प्रामुख्याने जैवविविधतेचा अपरिमित ऱ्हास, वन्य जीवनाचा अधिवास धोक्यात, नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास आणि हवामान बदल व पाण्याचे संकट इत्यादी गोष्टीचा त्यात समावेश आहे. तसेच प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे कायदेशीर व घटनात्मक उल्लंघने झाल्याचे आंदोलन कर्त्यांनी दिलेल्या हरकतीत नोंदवले आहे.

मागणी काय?

उत्तन येथे मेट्रो कारशेड उभारण्याचा निर्णय प्रशासनाने मागे घेण्याची मागणी आंदोलनकाऱ्यांनी केली आहे.याशिवाय प्रशासनाने प्रसिद्ध केलेली बेकायदेशीर नोटीस मागे घेणे,डोंगरी गावाला जैवविविधतेचे संरक्षित क्षेत्र घोषित करावे, वृक्षतोड तात्काळ थांबवावी, स्वतंत्र शास्त्रीय समितीमार्फत तपासणी करावी आणि वैकल्पिक स्थळाचा गांभीर्याने विचार व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे.