भाईंदर :- पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची शाडू मातीच्या मूर्तींचे वापर करण्याचे आवाहन मिरा भाईंदर महापालिकेने केले आहे. अशा शाडूच्या मूर्तींच्या वापरासाठी प्रोत्साहन दिले जात असल्याचा दावा पालिकेने केला आहे. मात्र प्रत्यक्षात शाडू माती मूर्तीच्या प्रदर्शनासाठी १ लाखांचे शुल्क आकारले आहे.
राज्य शासनाकडून पर्यावरण पूरक सण साजरे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार महापालिका प्रयत्नशील असून आठ महिन्यापूर्वीच ‘बाप्पा माझा शाडूचा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शाडूमाती निर्मितीला प्रोत्साहन आणि मदत देण्याचे धोरण महापालिकेने आखले आहे. त्यानुसार या उपक्रमाची व्याप्ती वाढावी म्हणून येत्या २ मार्च रोजी शाडू मातीच्या गणेश मुर्त्याचे प्रदर्शन गेहलोत यांनी भाईंदर येथील महापालिकेच्या आप्पासाहेब धर्माधिकारी हॉलमध्ये आयोजित केले आहे. मात्र हे सभागृह वापरण्याच्या मोबदल्यात पालिकेने गेहलोत यांना १ लाख १८ हजाराचे शुल्क आकारणी केली आहे.
एकीकडे पालिका आयुक्त संजय काटकर हे शहरात पर्यावरण पूरक उपक्रम राबवणाऱ्या संस्थेला सहकार्य करणार असल्याची घोषणा करतात आणि जे असा उपक्रम राबवितात त्यांच्याकडून शुल्क आकारत आकारले जात असल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष हसमुख गेहलोत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात माहिती घेऊन तोडगा काढला जाईल अशी प्रतिक्रिया आयुक्त संजय काटकर यांनी दिली आहे.