भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेने विविध विकास कामांसाठी विकास आराखड्यात ७ आरक्षणांमध्ये फेरबदल केले आहेत. त्यात प्राथमिक शाळा, मैदान आणि वाचनालयाचे आरक्षण बदलून त्याठिकाणी तरण तलाव प्रस्तावित करण्यात आला आहे. मिरा भाईंदर शहरासाठी १९९७ साली पहिल्यांदाच विकास आराखडा तयार करण्यात आला होता. २००२ साली महापालिकेच्या स्थापनेनंतर विकास आराखड्यात आरक्षित असलेल्या भूखंडाचा विकास करण्याचे काम प्रशासनामार्फत करण्यात आले. त्यानुसार सध्या स्थितीत शहरात शाळा,क्रीडा संकुल, नाट्यगृह, उद्यान, मैदान, सभागृह, आरोग्य केंद्र, रुग्णालय आणि इतर आवश्यक बनविण्यात आली आहेत. या विकास आराखड्याची मुदत २०१७ साली संपुष्टात आल्यामुळे प्रशासनाकडून नवा विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला असून त्यास शासनाच्या अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे.

दरम्यान मागील काही वर्षात मिरा भाईंदरची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे शासनाकडून शहरातील विविध विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. शासनाकडून मिळणाऱ्या या निधीचा वापर करण्यासाठी प्रशासनाकडून आरक्षण फेरबदल करून विकास कामे हाती घेतली जात आहेत. पालिकेने एकूण ७ आरक्षणात फेरबदल केले आहेत. त्यात दोन ठिकाणी शाळांचे आऱक्षण बदलून तेथे तरण तलाव आणि महापालिकेच्या कामासाठी आरक्षणे टाकण्यात आली आहेत. याशिवाय खेळाचे मैदान, वाचनालये आदींचेही आरक्षण बदलण्यात आले आहे.

ही आरक्षणे महापालिकेने बदलली:-

आरक्षण क्रमांकआरक्षित आरक्षणफेरबदल
११०प्राथमिक शाळा व मैदानतरण तलाव
२१०दवाखानारुग्णालय
२७१प्रस्तुती गृहरुग्णालय
२११सामुदायिक सभागृहरुग्णालय
२१९माध्यमिक शाळामहापालिका उद्धेश
२६०खेळाचे मैदानमहापालिका उद्देश
२७१दवाखाना व प्रसूती गृहमहापालिका उद्देश
२७२वाचनालयमहापालिका उद्देश

शासनाच्या मंजूरी नंतरच निर्णय:-

मिरा भाईंदर शहरात तरण तलाव, रुग्णालय, समाजभवन व लता मंगेशकर संगीत गुरुकुल उभारण्यासाठी शासनाने कोट्यवधींचा निधी मंजूर केला आहे. मात्र ज्या आरक्षित जागांवर ही विकासकामे प्रस्तावित करण्यात आली होती, त्या जागांवरील आरक्षण बदल करणे गरजेचे होते. म्हणून अशा आरक्षण बदलांचा प्रस्ताव पालिकेकडून २०२४ मध्ये शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. त्यावरून १५ मार्च २०२४ रोजी आरक्षण बदलांच्या प्रस्तावांना शासनाच्या नगरविकास विभागाकडून मंजुरी देण्यात आली असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

शाळेऐवजी तरण तलाव का?

मिरा भाईंदर महापालिकेच्या एकूण ३६ शाळा आहेत. यात जवळपास साडेनऊ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याशिवाय प्रशासनाकडून दोन नव्या शाळा उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहेत. मात्र भविष्यात लोकसंख्या वाढ झाल्यास अतिरिक्त शाळा उभारण्याची गरज प्रशासनाला भासणार आहे.परंतु असे असताना देखील शाळा आरक्षणात फेरबदल करून तरण तलाव सारख्या गोष्टीची उभारणी करणे संतापजनक असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे शहरात एकाच वेळी चार हुन अधिक तरण तलाव उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे.