भाईंदर :- मिरा भाईंदर शहराची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी मिरा भाईंदर महापालिकेने कलर कोड ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार शहरातील विविध इमारती, वास्तू आदींना विशिष्ट रंग देण्यात येत आहे. या कलर कोडमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडेल आणि प्रत्येक वास्तू त्या विशिष्ट रंगाने ओळखली जाणार आहे.
काही महिन्यांपूर्वी आयुक्त संजय काटकर यांच्या पुढाकाराने मिरा भाईंदर शहराची ओळख निर्माण करण्यासाठी परिषद आयोजित करण्यात आली होती. यात शहराच्या भौगोलिक, लोकसांख्यिक, शैक्षणिक, पर्यावरणीय आणि कायदेशीर बाबीत सुधारणा आणण्यासाठी तज्ञांचा सल्ला घेण्यात आला होता. या सर्व सल्ल्यानुसार ‘सीटी ब्रॅण्डिंग’ करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले होते. महापालिका शहरातील नागरिकांसाठी विविध सोयीसुविधा निर्माण करत असते. त्यासाठी अनेक वास्तू, इमारती उभारल्या जातात. त्यात शाळा, सभागृह, सार्वजनिक शौचालय, रुग्णालय, मैदाने, उद्याने, रस्ते, दुभाजक, जलकुभं व इतर अन्य गोष्टींचा समावेश असतो. मात्र या वास्तूंना वेगवेगळा रंग असायचा. त्यामुळे त्यांची स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी विशिष्ट रंग देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी कलर कोड लागू करण्यात आले आहे.
हेही वाचा – लाचखोर वनक्षेत्रपालाकडे सव्वा कोटी, ५८ तोळे सोने
कलर कोड म्हणजे काय?
याबाबत माहिती देताना पालिकेते शहर अभियंता दिपक खांबित यांनी सांगितले की, शहरातील वास्तूंना यापूर्वी कोणतेही रंग देण्यात येत होते. मात्र आता नव्या धोरणानुसार मालमत्तानिहाय पद्धतीने एकसमान रंग दिला जाणार आहे. यासह कोणत्याही वास्तूचे काम करताना किंवा दुरुस्ती करताना टाईल्स, लोखंडी जाळ्या व इतर असे साहित्य एकसारखे व चांगल्या दर्जाचे वापरले जाणार आहे. तसेच दिशादर्शक व माहिती फलकही एकाच डिझाईनचे लावण्यात येणार आहेत. यामुळे एखादी वास्तू बघताच नागरिकांना ते काय असू शकते, याचा अंदाज येणार आहे.
हेही वाचा – ‘देव तारी त्याला कोण मारी…’ अंगावर गाडी जाऊनही चिमुकला बचावला
असे असणार रंग
हिंदू स्मशानभूमी – पिवळा
शाळा – निळा आणि पिवळा
हॉस्पिटल – हिरवा आणि पांढरा
मैदान – हिरवा आणि पांढरा
दुभाजक – काळा आणि पांढरा
कार्यालय – निळा आणि राखाडी
बाजार – पिवळा आणि राखाडी