भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेची आर्थिक वर्ष अखेरीस २४१ कोटीची कर वसुली झाली आहे. तर ३९ कोटी रुपयांची तूट शिल्लक राहिली आहे. पालिकेने या वर्षी पाणी पट्टी कराची विक्रमी वसुली केली असून एकूण मागणीच्या ९८ टक्के वसुली करण्यात यश आले आहे.

मिरा भाईंदर महापालिकेच्या उत्पनाचे प्रमुख स्रोत हे मालमत्ता कर वसुली आहे.गत वर्षात महापालिकेला या करापोटी २४० कोटीचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र अखेरच्या दिवसापर्यंत १८४ कोटी रुपयांची वसुली झाली होती. यंदा मालमत्ता करापोटी २८० कोटी रुपयांचे उदिष्ट अपेक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे हे उद्दिष्ट वेळेत गाठता यावे म्हणून प्रशासनाने विविध उपाय योजना राबवण्याचे आदेश कर विभागाला दिले होते.यावरून आर्थिक वर्ष अखेरीस २४१ कोटी ५९ लाखाची वसुली करण्यात यश मिळाले आहे.यात तब्बल १ लाख ४० हजार मालमत्ता धाराकांनी ऑनलाईन पद्धतीने तर १ लाख ५९ हजार मालमत्ता धारकांनी ऑफलाईन पद्धतीने कराचा भरणा केला आहे.

कर वसुलीत वाढ

मिरा भाईंदर महापालिकेकडून दरवर्षी कर वसुलीचे उद्दिष्ट ठरवण्यात येते. मात्र अनेक मालमत्ता धारक कराचा भरणा करत नसल्यामुळे प्रशासनाला अपेक्षित उत्पन्न प्राप्त होत आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून कर भरणा पद्धत सोयीस्कर करण्याच्या दुष्टीने प्रशासनाने अनेक पावले उचलली आहेत.यात संकेत स्थळ, मोबाईल ऍप आणि पीओएस सारख्या डिजिटल माध्यमांचा अवलंब प्रशासनाने कामकाजात केला आहे.परिणामी यावर्षी प्रशासनाला २४१ कोटी वसुल करण्यात यश आले असून मागील वर्षाच्या तुलनेत यात ४८ कोटी रुपयांची वाढ झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे.

विक्रमी पाणी पट्टी वसुली

मिरा भाईंदर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ९८.५५ टक्के पाणी देयकाची वसुली केली आहे. चालू वर्षाची एकूण मागणी रक्कम १०६.९६ कोटी होती. त्यापैकी १०५.४० कोटी रुपयांची वसुली करण्यात महापालिकेला यश आले आहे. मागील थकबाकी ही २ कोटी १९ लाखांची होती. चालू वर्षाची थकबाकी १ कोटी ५५ लाख अशी एकूण ३ कोटी ७५ लाख एवढी आहे.

आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी पदभार स्विकारताच कर वसुलीचा आढावा घेतला होता. त्यानंतर जास्तीत जास्त रक्कम वसुल करण्याचे आदेश कर विभागाला दिला हेतो. सध्या राहिलेली थकबाकी देखील वसुल करण्याचे नियोजन कऱण्यात आले आहे. थकबाकीदारांची नळ जोडणी खंडि करण्याची कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिकेने दिला आहे.