भाईंदर :- मिरा भाईंदर महापालिकेच्या सर्व शाळा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नियंत्रणाखाली आल्या असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. त्यावरून विद्यार्थांच्या सुरक्षेच्या दुष्टीने बारीक नजर ठेवली जात आहे.मागील वर्षी (सप्टेंबर २०२४) मध्ये बदलापूर येथे दोन अल्पवयीन मुलींवर शाळेत लैगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यामुळे संपूर्ण राज्यभरातील वातावरण पेटून उठले आहे.यात प्रामुख्याने शाळांच्या सुरक्षेबाबतचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.याच धर्तीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी  राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शाळांनी करायच्या उपाययोजना संदर्भात आदेश  जारी केले आहेत. त्यानुसार मिरा भाईंदर महापालिका प्रशासनाने मागील काही महिन्यात खबरदारीच्या दुष्टीने अनेक सक्त निर्णय घेतले आहेत.यात शाळा आवरात महिला सुरक्षारक्षकांच्या संकेत वाढ करण्यासह संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नियंत्रणा खाली घेण्याचा प्रमुख निर्णय घेण्यात आला होता.

त्यावरून महापालिकेच्या ३६ शाळांमध्ये एकूण ३३९  कॅमेरे उभारण्यात आले आहेत.यात शाळा आवर,वर्ग, जिन्याचा परिसर, शौचालयाबाहेरील परिसर आणि शिक्षक खोली भागात हे कॅमेरे उभारण्यात आले असून पालिका शाळा शंभर टक्के सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नियंत्रणाखाली  आल्या असल्याची माहिती उपायुक्त  प्रसाद शिंगटे यांनी दिली आहे.

नियंत्रण कक्षाशी केंद्रीकृत

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या एकूण ३६ शाळेत प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे उभारले आहेत.या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना भाईंदर पश्चिम येथील नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आले आहे. त्यानुसार नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांकडून देखील शाळांवर नजर ठेवण्याचा हा प्रयत्न केला जात असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

शिक्षकांना देखील प्रशिक्षण:-

बदलापूर येथील घटना समोर आल्यानंतर खबरदारीच्या दुष्टीने मिरा भाईंदर महापालिका प्रशानाने अनेक पाऊले उचलली होती.यात प्रामुख्याने अशा परिस्थितीला हाताळण्याचे प्रशिक्षण  पोलिसांमार्फत शिक्षकांना देण्यात आले होते. यासाठी अर्पण या सामाजिक संस्थेने प्रशासनाला सहकार्य केले होते.