भाईंदर : मिरा भाईंदर शहरात भूजल पातळीत वाढ व्हावी यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प राबविण्याच्या सूचना पालिकेने केल्या होत्या. मात्र त्याकडे गृह संकुलांकडून पाठ फिरवली जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडून सक्त पावले उचलण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
मिरा भाईंदर शहरातुन सातत्याने पाणी टंचाईची समस्या पुढे येत आहे. यावर उपाय म्हणून शासनाने ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग'( जलसंचयन अथवा पाऊस पाणी संकलन ) योजना राबवण्याचे सक्त आदेश महापालिकेला दिले आहेत.या योजनेत पावसात पडणारे पाणी इमारतीच्या गच्चीवरून पाइपाद्वारे जमा करून ते जमिनीत साठवले जाते.या पाण्याचा नंतर वापर करता येतो.यावरून पालिकने सर्व नवीन बांधकामांना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग'(पर्जन्य जलसंचयन अथवा पाऊस पाणी संकलन योजना )केल्याशिवाय भोगवटा प्रमाणपत्र दिले जाणार नाही, असा निर्णय घेतला होता.त्याचबरोबर ज्या प्रस्थापित गुहसंस्था आहेत त्यांनी जर जलसंचय प्रकल्प राबविला असल्यास त्यांना मालमत्ताकरात ५ टक्के सवलत देण्याचे ठरविले होते.
त्यामुळे मागील काही वर्षात काही इमारतीत हे प्रकल्प उभे राहिले असल्याची नोंद पालिकेच्या दप्तरी करण्यात आली आहे. ही योजना निरंतर चालत राहण्यासाठी पालिकेने देखील या योजनेचे दरवर्षी मुदतवाढ प्रमाणपत्र घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. इतकेचे नव्हे तर हे पुनर्र-प्रमाणपत्र पालिकेकडे जमा केल्यास त्यावर देखील कर सवलत देणार असल्याचे जाहीर केले आहे.मात्र या योजनेच्या पूनर्र-प्रमाणिकरणाकडे गृह संकुलांनी पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा पालिकेकडून यावर कठोर उपाययोजना आखून अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पालिकेने सांगितले आहे. याशिवाय अधिक प्रभावीपणे जनजागृती करून त्याचे महत्त्व ही पटवून दिले जाणार आहे.
‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ची आकडेवारी
वर्ष | नवे प्रमाणपत्र | पुनर्रप्रमानीकरण |
२०१६-१७ | ४० | १३ |
२०१७-१८ | ८० | २२ |
२०१८-१९ | ४४ | २७ |
२०१९-२० | ५४ | २९ |
२०२०-२१ | ३४ | २४ |
२०२१-२२ | ४० | ३४ |
२०२२-२३ | २६ | २७ |
२०२३-२४ | ३६ | १५ |
२०२४-२५ | ५५ | २९ |
पुनर्र-प्रामाणिकरणाकडे पाठ :
मिरा भाईंदर पालिकेकेने मागील सात वर्षात ४०९ नव्या इमारतीत ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग ‘ प्रकल्प राबवणाऱ्यांना प्रमाणपत्र दिले आहेत.परंतु त्या तुलनेत केवळ २२० गृहसंकुलांनी पूनर्र-प्रामाणिकरण केले असल्याची बाब समोर आली आहे.त्यामुळे अशा गृहसंकुलांनी पुनर्रप्रमाणीकरण का केले नाही, याची प्रत्यक्ष जाऊन पालिकेने पाहणी करावी,अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून करण्यात आली आहे.
“मिरा भाईंदर शहरात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग ‘ प्रकल्प उभारण्याबाबत सातत्याने जनजागृती केली जात आहे. यामुळे मागील काही वर्षात गृह संकुलनमधील प्रकल्पात वाढ होत असून यात वाढ करण्याच्या दृष्टीने काम केले जात आहे.” दीपक खांबित -शहर अभियंता ( मिरा भाईंदर महानगरपालिका )