भाईंदर :- पर्यावरणपूरक गणेशोत्सव संकल्पना अधिक परिणामकाररित्या राबविण्यासाठी मिरा भाईंदर महापालिकेने आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहे. पालिकेने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घातली असून मूर्तीकारांच्या बैठका घेऊन त्यांना याची माहिती दिली जाणार आहे.
गणेशोत्सवातील प्रदूषण टाळून तो पर्यावरणपूरक साजरा केला जावा असे शासकीय धोरण असते. महापालिका त्यादृष्टीने उपक्रम राबवत असतात. परंतु ऐनवेळी प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींवर बंदी घातल्याने बंदीचा निर्णय कुचकामी ठरतो. प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती तयार झालेल्या असतात आणि मूर्तीकारांचे नुकसान होते. मागील वर्षी मूर्ती तयार झाल्यानंतर मिरा भाईंदर महापालिकेने ऐनवेळी बंदीचे आदेश काढले होते. त्यामुळे मूर्तीकारांनी विरोध केला होता. परिणामी गेल्या वर्षी देखील पर्यावरण पूरक सण साजरा झाला नाही.
हेही वाचा – अखेर वसई-भाईंदर रो-रो सेवेस सुरुवात, प्रायोगिक तत्त्वावर सेवा; प्रवाशांना मोठा दिलासा
हेही वाचा – चिंचोटी कामण-भिवंडी रस्त्याची दुरावस्था, नागरिकांचे दोन तास रास्ता रोको
यंदा मात्र पालिकेने आधीपासूनच प्रयत्न सुरू केले आहे. मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत आयुक्त संजय काटकर यांनी प्लास्टर ऑफ पॅरीसच्या (पीओपी) मूर्तींवर बंदीचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. पीओपीपासून मूर्त्यांची निर्मिती होऊ नये म्हणून शहरातील मूर्तिकार व विक्रेत्यांची बैठक घेऊन त्यांना ताकीद देण्यास त्यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले आहे. याशिवाय गणेश मंडळांनी पर्यावरण पूरक सण साजरा करावा म्हणून पालिकेकडून त्यांना पत्र पाठवण्यास सांगितले. यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करता येईल असा विश्वास उपायुक्त संजय शिंदे यांनी व्यक्त केला आहे. माजी महापौर हसमुख गेहलोत यांनी देखील पीओपी मूर्तींना बंदी आधीच जाहीर करण्याची मागणी केली होती.