भाईंदर : शासनाच्या आदेशानुसार मुदत वेळेत मराठा-कुणबी नोंदणीचा फेर-तपासणी अहवाल सादर न केल्यामुळे मिरा भाईंदरच्या शिक्षण अधिकाऱ्यांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. यात कामात दिरंगाई, बेजबाबदारपणा आणि नितांत सचोटी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

राज्यभरात मराठा आरक्षणावरून वातावरणात पेटून उठले आहे. त्यामुळे कमी वेळेत अधिकाधिक मराठा-कुणबी नोंदी शोधून काढण्याचे मोठे आव्हान राज्य शासनापुढे उभे राहिले आहे.यासाठी शासनाने २१ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२४ असे पाच दिवस विशेष मोहीम हाती घेतली होती.याबाबत ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून मिरा भाईंदर महानगरपालिकेला सर्व अभिलेखाची तपासणी करून आणखी कुणबी नोंदी शोधण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहरातील १९६७ पूर्वीच्या खासगी शाळा,महापालिका शाळा व इतर नोंदीची फेरतपासणी करून १०० टक्के तपासणी केल्याचा अहवाल २६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत सादर करण्याचे आदेश आयुक्त संजय काटकर यांनी शिक्षण अधिकारी सोनाली मातेकर यांना दिले होते.

हेही वाचा…भाजप नगरसेवकाचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांवर गंभीर आरोप, व्हिडिओ प्रसार माध्यमांवर व्हायरल

मात्र मुदत वेळ उलटून गेल्यानंतरही मातेकर यांनी अहवाल सादर केला नाही.परिणामी महापालिकेकडून शासनाकडे माहिती सुपूर्त झालेली नाही. त्यामुळे या गोष्टीची गंभीर दखल घेत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर यांनी शिक्षण अधिकारी सोनाली मातेकरांविरोधात कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. तसेच अपेक्षित स्पष्टीकरण न दिल्यास थेट शिस्त भंगाची कारवाई करणार असल्याचा इशारा पत्रात दिला आहे.

“मिरा भाईंदर मधील माहिती ही निरंक आहे. याबाबतची माहिती वरिष्ठांना दिली आहे.मात्र हे काम करण्यासाठी असलेले कर्मचारी विविध कामानिमित्त व्यस्त आहेत. त्यामुळे थोडा उशीर झाला असावा.”– सोनाली मातेकर , शिक्षण अधिकारी

Story img Loader