वसई- मिरा रोड येथील दुकानदार शम्स अन्सारी याच्या हत्या प्रकरणाला ११ दिवस उलटून गेले तरी गोळीबार करणारा आरोपी अद्याप हाती लागला नाही. याप्रकरणी गुन्हे शाखेने ३ आरोपींना अटक केली आहे. त्यात दोन भावांसह त्यांच्या बहिणीचा समावेश आहे. शुक्रवार ३ जानेवारी रोजी  रात्री मिरा रोड येथील शांती शॉपिंग सेंटर मधील दुकानदार शम्स अन्सारी उर्फ सोनू (३८) याची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती.

हेही वाचा >>> नायलॉन मांज्यामुळे दुचाकीस्वार जखमी, पतंग महोत्सवाच्या आयोजकांवर गुन्हा

फेरिवाल्यांच्या जागेवरून हा वाद झाला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकांनी सैफ आलम, युसूफ आलाम आणि तब्बसुम परवीन या तिघांना अटक केली आहे. मात्र गोळीबार करणारा मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. हत्येच्या दिवशी सैफ आलम आणि हल्लेखोर घटनास्थळावर गेले होते. हल्लेखोराने शम्स अन्सारी याच्यावर गोळीबार केल्यानंतर दोघे ट्रेनने वसईला आले. त्यानंतर सैफने हल्लेखोराला अजमेरला जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसवले होते. गुन्हे शाखेची विविध पथके त्यांच्या मागावर आहेत. मात्र ११ दिवस उलटूनही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

पोलीस उपायुक्तांच्या ‘त्या’ छायाचित्राने खळबळ

परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांचे आरोपी सैफ आलम याच्यासोबत एक छायाचित्र समाजमाध्यमावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र माझा आणि आरोपीचा काही संबंध नसल्याचे उपायुक्त गायकवाड यांनी स्पष्ट केले. मी मुलीसाठी गिटार खरेदी करण्यासाठी दुकानात गेलो होतो. त्यावेळी एका तरुणाने मी पोलीस असल्याने सोबत छायाचित्र काढण्याची विनंती केली होती. तो तरूण कोण आहे याची काही माहिती नव्हती. आता मात्र तो गोळीबार प्रकरणातील आरोपी असल्याचे समजले. त्याला मी ओळखत नाही आणि त्या दिवसानंतर कधीही त्याच्याशी संबंध आला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Story img Loader