वसई : मीरा रोडच्या नया नगर परिसरात झालेल्या दंगलप्रकरणी पोलिसांनी बुधवारपर्यंत १० गुन्हे दाखल केले असून १९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही दंगल पूर्वनियोजित नसल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांवर प्रसारीत होणार्‍या चित्रफिती बनावट असून ते पसरविणार्‍यांवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने मीरा रोडमध्ये आयोजित मिरवणुकीवर दगडफेक झाल्यानंतर नया नगर परिसरात दंगल उसळली होती. रविवारपासून शहरात असलेला तणाव बुधवारी निवळला. मात्र शहरातील पोलीस बंदोबस्त कायम आहे. पोलिसांनी दंगलखोराची धरपकड सुरू केली आहे. २१ जानेवारीपासून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बुधवारी दुपारपर्यंत एकूण १० गुन्हे दाखल करून १९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. समाजमाध्यमांवर धार्मिक तेढ पसरविल्याबद्दल माहिती तंत्रत्रान कायद्यांतर्गत २ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये २ जणांना अटक करण्यात आली आहे. हिंसाचाराच्या सर्व प्रकरणांमध्ये, आरोपींची ओळख पटवण्यासाठी नया नगर परिसरातील आणि आसपासच्या ४५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणांचे विश्लेषण सुरू आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी दिली. आम्ही शहरात शांतता प्रस्थापित कऱण्यासाठी प्रयत्न करत आहोत. मात्र या दंगलीमागे कुठलाही कट नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : विरार मध्ये शिक्षकाची हत्या, तरुणाला अटक

अफवा पसरविल्यास पोलिसांचा कारवाईचा ईशारा

मीरा रोड मधील दंगलीच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रक्षोभक चित्रफिती समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. पोलीस दल घरात घुसून समाजकंटकांना बाहेर काढत आहे, मीरा रोड स्टेशनला समाजकंटकांनी आग लावली, अशा अनेक चित्रफितींचा समावेश आहे. या सर्व चित्रफिती बनावट असून त्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. नया नगर घटनेनंतर व्हायरल होत असलेल्या एका चित्रफितीमध्ये रॅलीत सहभागी तरुणाच्या हातात बंदूक होती. यामुळे खळबळ उडाली होती. मात्र, पोलीस तपासात ही बंदूक प्लास्टिकचीच असल्याचे समोर आले आहे.

समाजमाध्यमांवर पोस्ट करण्यात आलेल्या प्रक्षोभक पोस्ट डिलिट करण्याची प्रक्रियाही सुरू आहे. मीरा रोड येथील राम मंदिरात झालेल्या धार्मिक हिंसाचाराच्या वेळी समाजमाध्यमांवर प्रक्षोभक वक्तव्य करणार्‍या अबू शेख याची चित्रफित व्हायरल झाली होती. त्याला अटक करून ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टात पोलिसांनी अबू शेखची व्हायरल झालेली चित्रफित न्यायालयासमोर सादर केली असून कोर्टाने त्याला दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. तसेच, अबू शेखची न्यायालयात हजेरी सुरू असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून न्यायालयाबाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.

हेही वाचा : २५ जानेवारीचा मीरा रोड, भाईंदर बंद मागे

सराफांच्या व्यवसायावर परिणाम

नया नगरमध्ये अनेक हिंदूंच्या सराफांची दुकाने आहेत. मात्र ही घटना घडल्यापासून कालपर्यंत कोणीही दुकानात न आल्याने व्यवसायावर परिणाम झाल्याचे सराफांनी सांगितले. नया नगर येथील कुबेर ज्वेलर्स दुकानाचे मालक किरीट इत्रावेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर गेल्या दोन दिवसांपासून आमचा व्यवसाय ठप्प झाला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर वारंवार दुकान बंद ठेवावे लागत असल्याने ग्राहकांना वेळेवर माल पोहोचवता येत नसल्याने व्यवसायावर परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mira road violence not pre planned 19 arrested and 10 police cases registered css