वसई: मंगळवारी नालासोपाऱ्यात गॅस पाईप फुटून द्वारका हॉटेलला आग लागल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी विरार पश्चिमेच्या भागात मिसळ दुकानाला भीषण आग लागली होती. सकाळी पावणेआठच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत दुकान जळून खाक झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विरार पश्चिमेच्या रेल्वे स्थानकाजवळील गावठण रस्त्यावर आनंद लक्ष्मी इमारत आहे. त्यातील गाळा क्रमांक ५ आणि ६ मधील घुमटकर मिसळचे दुकान आहे. बुधवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास या दुकानात अचानकपणे आग लागली होती. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. या घटनेची माहिती पालिकेच्या विरार अग्निशमन केंद्राला मिळताच घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू करण्यात आले होते मात्र आगीने अधिकच पेट घेतल्याने इमारतीमध्ये धुराचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे तातडीने या इमारतीमध्ये राहत असलेल्या नागरिकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. तर दुकानात असलेले सात सिलेंडरसुद्धा बाहेर काढण्यात आले.

हेही वाचा – अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दोनदा प्रसुती; पहिल्या बाळाची केली विक्री, १६ जणांविरोधात गुन्हे

जवळपास दोन ते अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली असल्याची माहिती पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून दुकानं जळून खाक झाले आहे. आग लागली तेव्हा दुकान बंद होते, आग कशाने लागली हे समजले नाही.

हेही वाचा – नालासोपाऱ्यात गॅस गळतीमुळे भीषण आग, तीन जण जखमी; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू

मंगळवारी नालासोपाऱ्यात गॅस पाईप फुटून द्वारका हॉटेल जळून खाक झाले होते. तर सातजण होरपळून जखमी झाले होते. सातत्याने वसई विरारमध्ये आग दुर्घटना समोर येत असल्याने शहरातील अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Misal shop caught fire in virar the shop was gutted in the fire fire accidents continue in the city ssb