वसई– तीन वर्षाच्या प्रशासकीय राजवटीत अधिकार्यांनी शहराचा सत्यानाश केला आहे. आयुक्त तुम्हाला पालिकेत येऊन फटकावेन, अशा भाषेत आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पालिका आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांना दमदाटी केली. स्वातंत्र्यादिनानिमित्ताने पालिका मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर झालेल्या कार्यक्रमात नागरिकांच्या समस्या ऐकून संतप्त झालेल्या आमदार हितेंद्र ठाकूर यांनी अधिकार्यांना चांगलेच फैलावर घेतले. आयुक्तांचा एकेरी उल्लेख करून चांगलीच दमदाटी केली.
हेही वाचा >>> वसईच्या समुद्र किनाऱ्यांची सुरक्षा केवळ ९ जीवरक्षकांवर
स्वांतत्र्यदिना निमित्ताने वसई विरार महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार यांच्या हस्ते मुख्यालय परिसरात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर उपस्थित होते. कार्यक्रमांनंतर नागरिकांशी पाणी टंचाई, वाहतूक कोंडी पासून आरोग्यच्या समस्येवर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे आमदार हितेंद्र ठाकूर पालिका अधिकार्यांवर चांगलेच भडकले होते. आयुक्तांनाचा एकेरी भाषेत उल्लेख करून जाब विचारला. आयुक्तांना तर मुख्यालयात येऊन फटकावेन असा सज्जड दम दिला. फक्त वसुली करत असता असे सांगून वसुली करणार्या अधिकार्यांची बदली करेन असे सांगितले. उत्तर देण्यासाठी उभे राहणार्या प्रत्येक अधिकार्याला आमदार ठाकूर खडसावत होते.
पालिका उपायुक्त चारूशिला पंडित या उभ्या राहिल्या असता ‘ए शहाणपणा करू नकोस. मला पोपटांकडून उत्तरं नको’आयुक्तांकडून उत्तर हवं असं सांगितले. आयुक्तांचा अनेकदा एकेरी भाषेत उल्लेख केला. काय कमिश्नर तू कशाला आहेस इकडे? तीन वर्ष प्रशासकीय राजवटीत शहराची वाट लावली. स्वत:ला काय राजे समजता का? असं विचारून धारेवर धरले. या संदर्भात आयुक्त तसेच कुठल्याही अधिकार्यांनी अधिकृतपणे प्रतिक्रिया दिली नाही.