लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई : नायगाव मधील उड्डाणपूल सुरू होऊन केवळ दोन वर्ष झाली असून एमएमआरडीएने आतापासून त्याची जबाबदारी झटकली आहे. या पूलावरील पथदिव्यांची साडेचार लाखांची देयके थकली आहे. पथदिवे बंद असल्याने पुलावर सतत अंधार असतो. स्थानिकांच्या विनंतीनुसार महावितरणाने पथदिवे सुरू केले असून एक आठवड्याची शेवटची मुदत दिली आहे.

नायगाव शहराच्या पूर्वे आणि पश्चिमेला जोडण्यासाठी एमएमआरडीएने उड्डाणपूल तयार केला आहे. या पूलाचे काम तब्बल ९ वर्षे रखडले होते. हा पूल १.२९ किलोमीटर लांबीचा आहे. या उड्डाणपूलामुळे नागरिकांची मोठी सोय झाली असून पूर्व-पश्चिमेला ये-जा करणे सोपे झाले आहे. २०२२ मध्ये हा पूल वाहतुकीसाठी अनौपचारीक पघ्दतीने खुला करण्यात आला होता. सध्या हा पूल एमएमआरडीएच्या अखत्यारीत आहे. या पुलावर शंभरहून अधिक पथदिवे आहेत. मात्र या पथदिव्यांचे देयक एमएमआरडीएकडून भरले जात नसल्याने वारंवर महावितरण वीजपुरवठा खंडीत करतो आणि पूलावर अंधार पसरत आहे. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होते शिवाय अपघाताचाही धोका निर्माण झालेला आहे. सध्या या पथदिव्यांच्या देयकाची थकबाकी साडेचार लाखांहून अधिक झाली आहे. परंतु एमएमआरडीएने देयकांचा भरणा केला नसल्याने महावितरणाने वीजपुरवठा खंडीत केला आहे. बहुजन विकास आघाडीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी विनंती केल्याने महावितरणने एक आठवड्याची मुदत देऊन वीज पुरवठा पूर्ववत केला आहे. जर एक आठवड्यात वीज देयकाचा भरणा झाला नाही तर कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडीत केला जाईल, असा इशारा एमएमआरडीएने दिला आहे.

आणखी वाचा-अखेर शिवसेनाच्या बेकायदेशीर कंटेनर शाखांना पालिकेच्या नोटीसा

पूलावरील पथदिव्यांचे देयके भरण्यापेक्षा एमएमआरडीएला पथदिव्यांची जबाबदारी पालिकेवर ढकलण्याची घाई झाली आहे. एमएमआरडीएने मागील वर्षीच वसई विरार महापालिकेला पत्र लिहून पथदिवे वीज मीटरसहीत हस्तांतरीत करून घ्यावे आणि देखभाल दुरूस्ती करावी असे कळवले आहे. पुलाचा दोषदायित्व कालावधी (डिपीएल) हा ५ वर्षांचा आहे. त्यामुळे वीज देयके भरणे तसेच देखभाल दुरूस्तीचे काम हे एमएमआरडीएचे असल्याचे पालिकेने सांगितले. वीज देयके हे एमएमआरडीएच्या नावावरच आहेत. पूल हस्तांतरीत झाल्याशिवाय कुणालाच ती देयके भरता येणार नाही असे वसई विरार महापालिकेचे कार्यकारी अभियंता (विद्युत) अमोल जाधव यांनी सांगितले.

पूल हस्तांतरीत होण्यास ५ वर्षांचा कालावधी

एमएमआरडीएने २०२२ मध्ये पूल पुर्ण करून वाहतुकीसाठी खुला केला होता. करारानुसार दोषदायित्व कालावधी हा ५ वर्षांचा आहे. त्यानंतर तो सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग केला जातो. त्यावरील पथदिव्यांची सेवा ही पालिका देत असते. ५ वर्षांनंतर पूल हस्तांतरीत होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत ठाकरे यांनी सांगितले. एमएमआरडीएने अद्यापही पूलाचे औपचारिक उद्घाटन केलेले नाही. त्यामुळे पूलाला अधिकृत नाव देण्यात आलेले नाही. मात्र एमएमआरडीएच्या उदासिनतेमुळे स्थानिकांची या पूलाला स्वर्गीय धर्माजी पाटील असे नामकरण केले आहे. आम्ही महावितऱणाला विनंती करून पथदिवे सुरू केले आहेत. आता एमएमआरडीने थकलेले साडेचार लाखांचे वीज देयक भरावे, अशी मागणी बहुजन विकास आघाडीच्या आशिष वर्तक यांनी केली आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mmrd took over the responsibility of naigaon flyover street lights mrj