वसई : वसई विरार शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या ४ उड्डाणपूलांना एमएमआरडीएने प्रशासकीय मान्यता दिली आहे. रेल्वेच्या परवानगीनंतर कामाला सुरुवात केला जाणार आहे. या उड्डाणपूलांमुळे वसईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई विरार शहराचे क्षेत्रफळ ३८० चौरस किलोमीटर असून शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात गेली आहे. शहरातील रस्ते अरूंद असून त्यावर वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सर्वाधिक वाहतूक कोंडी ही शहराच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी होत असते. त्यासाठी रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) बांधण्याची संकल्पना समोर आली होती. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पालिकेने शहरात ४ रेल्वे उड्डाणपूलांचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी एमएमआरडीएकडे पाठवला होता. त्यामध्ये उमेळा (वसई), आचोळे (नालासोपारा) अलकापुरी (नालासोपारा) आणि विराट नगर (विरार) या चार उड्डाणपूलांचा समावेश होता. या ४ पूलांच्या निर्मितीसाठी १५५ कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र निधी अभावी उड्डाणपूल निर्मितीचे काम रखडले होते.

हेही वाचा…Crime News : खिशातील पत्रामधील ‘ती’ चार अक्षर अन् पोलिसांनी लावला सिनेसृष्टीतील खुनाचा छडा!

पालिकेकडून या उड्डाणपूलांचे काम केंद्र शासनाच्या ‘सेतू भारतम’ या योजनेतून करण्याचेही प्रयत्न करण्यात आले होते. मात्र ते न झाल्याने आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा केला होता. अखेर एमएमआरडीएने या रेल्वे उड्डाणपूलाच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.

या संदर्भात आम्ही एमएमआरडीएकडे प्रस्ताव दिला होता. त्यासंदर्भातील सर्वेक्षण आणि आराखडे सादर केले होते. रेल्वेकडून मंजूरी करून घेण्याचे काम पालिकेला करावे लागणार आहे, अशी माहिती पालिकेचे कार्यकारी अभियंता प्रदीप पाचंगे यांनी दिली. शहरांतर्गत वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर आणि राजेश पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. हे चार रेल्वे उड्डाणपूल तयार झाल्यास पूर्व आणि पश्चिमेकडील वाहतूक कोंडीची समस्या ५० टक्कयांनी कमी होईल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे, असा विश्वास माजी महापौर नारायण मानकर यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा…ठाणे जिल्ह्याची चौफेर कोंडी; वसई फाट्यावर ट्रक उलटल्याने १५ तास वाहतूक ठप्प

वसई विरारसाठी मंजूर झालेले रेल्वे उड्डाणपूल

१) अलकापूरी- (वसई आणि नालासोपारा रेल्वे स्थानकादरम्यान)

२) ओस्वाल नगरी- (विरार आणि नालासोपारा रेल्वे स्थानकादरम्यान)

३) विराट नगर- ( विरार आणि नालासोपारा रेल्वे स्थानकादरम्यान)

४) उमेळमान- (वसई आणि नायगाव रेल्वे स्थानका दरम्यान)

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mmrda approves 4 flyovers to alleviate traffic issues in vasai virar psg