भाईंदर :- काशिमीरा येथे मेट्रो मार्गीका ९ च्या कामादरम्यान रस्ता खचून डंपर उलटल्याने २५ वर्षीय चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. त्यावरून एमएमआरडीएने मेट्रो कंत्राटदाराला ३० लाखाचा तसेच कामाच्या सल्लागाराला १० लाखाचा असा एकूण ४० लाखाचा दंड आकारला आहे.
मिरा भाईंदर मेट्रो मार्गका ९ चे काम सध्या प्रगतीपथावर सुरु आहे.याबाबचे कंत्राट ‘जे कुमार’ या संस्थेला देण्यात आले आहे.गेल्या चार वर्षात मेट्रोचे पिलर उभारण्यासाठी खोलवर खड्डा करण्यात आल्यामुळे आसपासच्या रस्त्याची दूरवस्था झाली आहे.त्यामुळे अशा रस्त्याच्या दुरुस्तीचे काम देखील कंत्राटदारकडून हाती घेण्यात आले आहे.दरम्यान ४ डिसेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास काशिमीरा येथे सिमेंटने भरलेले डंपर फिरवत असताना रस्ता खचल्याने त्यात पडून आशिष कुमार (२५) नामक चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती.
हेही वाचा >>> प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी
चालकाला वाहन मागे घेण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडल्याचा एमएमआरडीएचा अंदाज आहे.मात्र मेट्रो मार्गीकेच्या कामासाठी एमएमआरडीएने ‘शून्य अपघात धोरण’ राबवले आहे.परिणामी या अपघातामुळे मूळ धोरणाला धक्का बसला असून कंत्राटदाराच्या कामातील निष्काळजीपणा समोर आला आहे. त्यामुळे सदर घटनेची दखल घेत जे कुमार या कंत्राटदाराला ३० लाखाचा आणि मेट्रोमार्गीकेच्या सल्लागाराला १० लाखाचा दंड आकाराला असल्याची माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा >>> वसईत रंगली राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा, साताऱ्याचा कालिदास हिरवे विजेता
पोलिस ठाण्यात गुन्हा मेट्रो मार्गीका उभारणीच्या कामादरम्यान घडलेल्या अपघातानंतर काशिमीरा पोलिसांनी एमएमआरडीए प्राधिकरणाच्या स्थळ अभियंता शशांक गुप्तावर मृत्यूस कारणीभूत ठरण्याचा तसेच निष्काळजीपणा बाळगल्याप्रकरणी कलम १०६ व १२५ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.