वसई- सूर्या पाणी प्रकल्पाच्या कवडास येथील जलशुध्दीकरण प्रकल्पातील रोहित्र बिघाडावरून वाद निर्माण झाला आहे. महावितरणाचे रोहित्र बिघडल्याने पाणी पुरवठा बंद झाल्याचे महापालिकेने सांगितले होते. मात्र बुधवारी महावितरणाने प्रसिध्दीपत्रक काढून महापालिका दिशाभूल करत असल्याचे सांगितले. रोहित्र दुरूस्तीची जबाबदारी ही एमएमआरडीएचीच असल्याचे महावितरणाने स्पष्ट केले.
वसई विरार शहराला सुर्या पाणी प्रकल्पातून एमएमआरडीएच्या माध्यमातून दररोज १४० दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा केला जातो. त्यासाठी महावितरणकडून एमएमआरडीएच्या कवडास येथील पंपिंग स्टेशनला ३३/६.६ केव्ही क्षमतेची वीजजोडणी मार्च २०२३ मध्ये देण्यात आली आहे. २५ मार्चला कवडास येथील एमएमआरडीएचे रोहित्र नादुरुस्त झाले आणि शहराला होणारा पाणी पुरवठा ठप्प झाला.
तब्बल ६ दिवस वसई विरार मध्ये पाणी पुरवठा बंद होता. त्यानंतर हे रोहित्र वापी येथून दुरूस्त करण्यात आले होते. त्यानंतर त्यात सोमवारी संध्याकाळी पुन्हा बिघाड झाला. महापालिकेने प्रसिध्दी पत्रक काढून या दोषाला महावितणरणाला जबाबदार धरले होते. त्याचे महावितरणाने खंडण केले आहे.
वसई-विरार महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या एमएमआरडीएला महावितरणकडून सुर्या प्रकल्प येथील पाणीउपसा आणि कवडास येथील पंपिग स्टेशनला उच्चदाब वीजजोडणी देण्यात आली आहे. एमएमआरडीए उच्चदाब ग्राहक असल्याने त्यांच्या मीटरपर्यंत सुरळीत वीजपुरवठा करण्याची जबाबदारी महावितरणवर आहे. तर मीटर नंतरच्या रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) व त्यापुढील वीजपुरवठ्याला सर्वस्वी एमएमआरडीए जबाबदार आहे, असे महावितरणाने सांगितले.
एमएमआरडीएच्या मीटरपर्यंतचा वीजपुरवठा महावितरणकडून सुरळीत सुरू असून नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करण्याची जबाबदारी एमएमआरडीएची आहे. या रोहित्राच्या दुरुस्तीशी महावितरणचा दुरान्वयानेही संबंध नसताना वसई-विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून प्रसिद्धीसाठी काढण्यात आलेले पत्रक दिशाभूल करणारे आहे, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.
एमएमआरडीए उच्चदाब ग्राहक असल्याने या रोहित्राच्या दुरुस्तीची जबाबदारी एमएमआरडीएवर आहे. त्यानुसार त्यांनी संबंधित रोहित्र दुरुस्त करून ३० मार्चला सांयकाळी कार्यान्वित केले. परंतू दुसऱ्या दिवशी ३१ मार्चला सायंकाळी पुन्हा या रोहित्रामध्ये बिघाड झाला. रोहित्रातील बिघाड दुरुस्त करून तो पुन्हा कार्यान्वित करण्याची जबाबदारी एमएमआरडीएचीच आहे.
दरम्यान कवडास येथील एमएमआरडीएच्या रोहित्रापर्यंत महावितरणचा वीजपुरवठा सुरळीत सुरू आहे. ही वस्तुस्थिती असताना वसई-विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून १ एप्रिलला प्रेसनोट जारी करून संबंध नसताना महावितरणचा उल्लेख करून दिशाभूल केली आहे. कवडास येथील एमएमआरडीएच्या नादुरुस्त रोहित्राच्या दुरुस्तीत व वसई-विरार शहराच्या पाणीपुरवठ्याला आलेल्या अडथळ्यात महावितरणचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण महावितरणाने दिले आहे.