भाईंदर : दुकानाबाहेर मराठी भाषेतील पाट्या लावण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतरही त्याकडे कानाडोळा करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात मनसेने आक्रमक पाऊस उचलण्यास सुरुवात केली. त्यानुसार मीरा भाईंदर मधील मोठ्या दुकानाबाहेरील तसेच आस्थापनेवरील इंग्रजी पाट्यावर मनसे कार्यकर्त्यांनी काळे फासले असल्याचे दिसून आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील दुकाने व आस्थापनांवर मराठी देवनागरी लिपीत, ठळक अक्षरात नाम फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.यासाठी न्यायालयाने दुकानदारांना दिलेली दोन महिन्याची मुदत देखील संपुष्टात आली आहे.त्यामुळे मीरा भाईंदर महापालिकेकडून शहरातील दुकानदारांना मराठी पाट्या लावण्याबाबत नोटीसा बजावल्या आहेत.परंतु तरी देखील मोठे दुकानदार या आदेशाचे पालन करण्याकडे पाठ फिरवत आहे.
हेही वाचा… वसई विरारचा पाणी प्रश्न खरंच सुटलाय का?
हेही वाचा… वसई : गाडीत डुलकी लागली आणि गमावला दीड लाखांचा फोन
त्यामुळे अश्या दुकानदारांवर वचक बसवण्यासाठी मीरा भाईंदर मनसे पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. यात शनिवारी दुपारी मीरा भाईंदरच्या मुख्य मार्गांवरील दुकानांवर असलेल्या इंग्रजी पाट्या या कार्यकर्त्यांनी शाहीने खोडून काढल्या आहेत. तसेच लवकरच या पाट्या मराठी मध्ये लावण्याची ताकीद दुकानदारांना दिली आहे. येत्या दिवसात दुकानदारांनी असे न केल्यास यापेक्षा कठोर पाऊल उचलणार असल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष हेमंत सावंत यांनी जाहिर केले आहे. तर मनसेने केलेल्या या कृत्याबाबत स्थानिक दुकानदारांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.