महापालिका सभेत ठराव मांडणार
भाईंदर : साधन सामुग्रीच्या अभावामुळे शिक्षणापासून वंचित राहत असलेल्या पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मोबाइल, टॅब उपलब्ध करून देण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. याकरिता आगामी महासभेत याविषयी ठराव मांडण्यात येणार असून टॅब विकत घेण्याकरिता प्रशासनाच्या हालचाली सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
करोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा फटका लहान मुलांना अधिक बसणार असल्याचे स्पष्ट करण्यात आल्यामुळे लसीकरण पूर्ण होईपर्यंत शाळा सुरू करण्यात येणार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याची तक्रार सातत्याने करण्यात येत आहे. त्यात मीरा-भाईंदर शहरातील गरजू विद्यार्थाच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मीरा-भाईंदर शहरात महानगरपालिकेच्या एकूण ३५ शाळा असून त्यात मराठी, हिंदी, गुजराती आणि उर्दू माध्यमाचे विध्यार्थी शिक्षण घेत आहेत. पहिली ते आठवीपर्यंतच्या विध्यार्थाची संख्या ६ हजार १७० इतकी आहे.यात पालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार मोबाइल फोन नसलेल्यांची संख्या ७०० आहे तर १९६७ विद्यार्थ्यांकडे साधे फोन आहेत. तसेच दूरदर्शनद्वारे शिक्षण उपलब्ध केवळ २५०५ विद्यार्थ्यांपर्यंतच पोहचू शकत आहे. आणि २१६६ विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड फोन असल्यामुळे त्यांना झूम आणि व्हाट्सअॅपद्वारे शिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचणी येत असून शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्याची बातमी लोकसत्ता वृत्तपत्रात ९ जून रोजी बातमी प्रकशित करण्यात आली होती.
त्या बातमीची दाखल घेत मीरा-भाईंदर शहरातील विद्यार्थाना तात्काळ टॅब उपलब्ध करून देण्याची मागणी भाजप नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांनी प्रशासनाजवळ केली.त्यानुसार महापौर ज्योस्त्ना हासनाळे यांनी शिक्षण विभागाच्या उपायुक्तसह बैठक करून याकरिता आवश्यक बाबींवर चर्चा केली.यामुळे येत्या महासभेत यावर चर्चा करून टॅब खरेदी करणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आली आहे.
सहावी ते दहावीच्या विद्यार्थाना मिळणार टॅब!
मीरा-भाईंदर शहरातील पालिका शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना टॅब देण्याची मागणी महापौर ज्योस्त्ना हासनाळे यांनी प्रशासनाकडे केली आहे. यात सध्या पालिका शाळेत असलेल्या सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना तसेच आठवीनंतर खाजगी शाळेत शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील टॅब देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या महासभेत यावर चर्चा करून लवकरच टॅब खरेदी करण्यात येतील अशी माहिती उपायुक्त संभाजी वाघमारे यांनी दिली.