लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
वसई : विरारच्या नोटा वाटप प्रकरणात विवांता हॉटेलच्या चालक मालक यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी या हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणी विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बविआच्या कार्यकर्त्यांनी साडेचार तास नेत्यांना डांबून धुमाकूळ घातला होता.
विरार मधील नोटा वाटप प्रकरण संपूर्ण देशात गाजले आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणी विनोद तावडे मतदानाच्या आदल्या दिवशी मंगळवार १९ नोव्हेंबर रोजी या हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांची सभा घेत होते. त्यावेळी ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बविआचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये शिरले होते. बविआचे आमदार हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांनी विवांता हॉटेल मध्ये तावडे यांच्यासहीत महायुतीच्या पदाधिकार्यांना साडेचार तास डांबले होते. पैसे वाटप करून मतदारांना लाच देणे, प्रचाराचा कालावधी संपल्यानंतरही ४८ तासात मतदारसंघात बेकायदेशी प्रवेश करून सभा घेणे, पत्रकार परिषद घेणे तसेच मारहाण करणे याप्रकरणी वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. आता महायुतीच्या कार्यकर्त्यांना प्रचाराचा कालावधी संपला असतानाही बेकायदेशीरित्या हॉटेल वापरण्यास दिल्याप्रकरणी हॉटेलचे चालक आणि मालक रत्नाकर महालिंगा शेट्टी, सुरेश महाबळ शेट्टी, ज्योती जाधव, हेमंत जाधव आणि अन्य भागिदारांविरोधात लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५१ च्या कलम १२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
आणखी वाचा-नालासोपारा मतदारसंघ संवेदनशील, चिखल डोंगरी मतमोजणी केंद्राच्या रस्त्यावर प्रवेश बंदी
पोलिसांची भूमिका संशयास्पद
विवांता हॉटेलमध्ये साडेचार तास भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांना डांबून ठेवले होते. मात्र या कालावाधीत पोलिसांनी काहीच कारवाई न केल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या सभेचे आमंत्रण लिंक पाठवून देण्यात आले होते. या हॉटेलमध्ये सुमारे चारशे कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आले होते, तरी पोलिसांना त्याची माहिती का नव्हती? गोपनिय विभाग काय करत होता असा सवाल उपस्थित झाला होता. घटनास्थळी दोन पोलीस उपायुक्त, एक अतिरिक्त आयुक्त हजर होते. मग आत मारहाण आणि नेत्यांना डांबून ठेवले असताना पोलिसांनी विशेष ऑपरेशन करून त्यांची सुटका का केली नाही? असा प्रश्न विचारला जात आहे. पोलिसांनी ठरवलं असतं तर ५ मिनिटात हॉटेल खाली करता आले असते. वसई विरार मधील ३६ जुन्या आणि अनुभवी पोलिसांच्या बदल्या झाल्या आहेत. जर हे अनुभवी पोलीस असते तर हा प्रसंग एवढा वाढला नसता, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने सांगितले.