लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई : बेकायदेशीरपणे व्याजाने कर्जे देऊन आर्थिक पिळवणूक करणारी सावकारी टोळी वसईत कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. माणिकपूर पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेसह ५ जणांविरोधात सावकारी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले आहे. ही टोळी प्रामुख्याने रिक्षाचालकांना कर्जे देऊन त्यांचे आर्थिक शोषण करत होती.

वसई विरार मध्ये परराज्यातून मोठ्या संख्येने नागरिक स्थलांतरीत होऊन रहायला येतात. उपजिविकेसाठी ते रिक्षा चालवत असतात. त्यांना पैशांची गरज असते. अशा लोकांना बेकायदेशीरपणे व्याजाने कर्जे देऊन नंतर त्यांची आर्थिक शोषण करणारी एक टोळी वसईत कार्यरत होती. यातील एका प्रकरणात माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

आणखी वाचा-अखेर भाईंदर मधील बस आगार विकसित करण्यास मंजूरी; १३६ कोटीचा खर्च अपेक्षित

निलेश राठोड या रिक्षाचालकाने रेखा कनोजिया या महिलेकडून १ लाखांचे कर्ज घेतले होते. त्या बदल्यात मुद्दल संपेपर्यंत महिन्याला १० हजार आणि तीन कोरे धनादेश या सावकार महिलने घेतले होते. सुरवातीचे दोन महिने राठोड याने २० हजार रुपये कसेबसे फेडले. मात्र त्याला शक्य झाले नाही. त्यानंतर राठोडच्या आईने पदरमोड करून ८० हजार रुपये दिले. परंतु ही व्याजाची रक्कम असून मुद्दम बाकी आहे असे त्याला सांगण्यात आले. मुद्दलाचे ९० हजार रुपये दोन दिवसात भरण्याची धमकी देऊन त्याची रिक्षा जप्त करण्यात आली.

याशिवाय कोर्‍या धनादेशावर ६ लाख रुपये टाकून वसूल करण्याची धमकी दिली. आधीच कर्ज, त्यावर वाढते व्याज आणि हातातील रिक्षा देखील गेल्याने राठोड हवालदील झाला होता. अखेर त्याने माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. माणिकपूर पोलिसांनी रेखा कनोजिया व तिची मुलं दर्पण कनोजिया ,रोहित उर्फ चंदन कनोजिया, सागर कनोजिया यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम२०२३ कलम३५१(२),३५२, सह महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ कलम ३९,४५,४६. नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी सावकारांनी जप्त केलेली रिक्षा तक्रारदारास परत मिळवून दिली.

आणखी वाचा-नागरिकांनी पकडलेल्या चोराची केली ‘सुटका’, आचोळे पोलिसांचा ‘अजब’ कारभार

आरोपी हे वसईत बेकायदेशीरपणे व्याज देण्याचा व्यवसाय करत होते. अनेकांनची त्यांनी आर्थिक फसवणूक केली आहे. आम्ही आरोपींविरोधात नोटीस बजावून गुन्हा दाखल केला आहे. या टोळीने कुणाला अशाप्रकारे व्याज देऊन फसवणूक केली असल्यास माणिकपूर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक हरिश पाटील यांनी केले आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Moneylender gang active in vasai illegally giving loans at interest and extorting money mrj