लोकसत्ता प्रतिनिधी
वसई : महावितरणची विद्युत पुरवठा करणारी बहुतांश यंत्रणा खारभूमी असलेल्या जागेतून गेल्याने पावसाळ्यात व वादळी वाऱ्यात तांत्रिक अडचणी येतात. या तांत्रिक अडचणीतून सुटका व्हावी यासाठी महावितरणने जुने विद्युत खांब बदलून त्याठिकाणी नवीन मोनोपोल उभारणीचे काम सुरू केले आहे. शहरात २७८ ठिकाणी असे खांब उभे केले जाणार आहेत.
वसई विरार शहरात महावितरण कडून वीज पुरवठा केला जातो. वीज पुरवठा करणाऱ्या काही वाहिन्या या खारभूमी जागा असलेल्या जागेतून गेल्या आहेत. अशा ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात साचून राहते. एखाद्या वेळी पावसाळ्यात वादळी वारे व इतर आपत्कालीन परिस्थितीत वाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड होण्याच्या घटना घडतात. अशा वेळी त्या ठिकाणी जाऊन दुरुस्ती करणे महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी जिकरीचे काम असते. त्यामुळे वीज दुरुस्तीचे काम करताना ही विलंब होऊन अधिक काळ शहरातील वीज पुरवठा खंडित राहतो.या समस्येतून सुटका व्हावी यासाठी मोनोपोल उभारणी करण्याची कामे हाती घेतली आहेत.
आणखी वाचा-मिरा भाईंदराला आता विविध रंगांची ओळख, पालिकेने लागू केला ‘कलर कोड’
यापूर्वी पहिल्या टप्प्यात महावितरणने शंभरहून अधिक ठिकाणी मोनोपोल उभारले होते. तर आता दुसऱ्या टप्प्यात ही आणखीन जुने खांब बदली करून त्या ठिकाणी नव्याने मोनोपोल लावले जाणार आहेत. यात नॉन एमआयडीसी परिसरात १४०, नालासोपारा परिसर ७२, आणि विद्युत चार्जिंग स्टेशन या भागासाठी ६६ असे एकूण २७८ ठिकाणी मोनोपोल उभारणी केली जाणार आहे.त्या उभारणीचे काम ही सुरू केले असून त्या खांबांवर वीज वाहक तारा ही अंथरण्याची कामे केली जाणार असल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांनी सांगितले आहे.
खार जागा आहे त्याठिकाणी या खांबांची विशेषतः गरज होती. त्याचे काम टप्प्याने सुरू आहे. जसे काम पूर्ण होईल तसा वीज पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल असेही खंडारे यांनी सांगितले आहे.
आणखी वाचा-लाचखोर वनक्षेत्रपालाकडे सव्वा कोटी, ५८ तोळे सोने
मोनोपोलचा फायदा कसा होणार ?
मोनोपोल सुरवातीला जे जुने खांब होते त्याही पेक्षा उंच आहेत. त्याची उंची जवळपास १५ मीटर इतकी आहे. विशेषतः खार जागा दलदलीची असल्याने जुने खांब कोसळून पडण्याची भीती होती. हे खांब आता उभारताना त्यात काँक्रिटकरणाचा एक मजबूत कॉलम तयार करून त्यावर तो खांब उभा केला जात आहे. मोनोपोल पडण्याची भीती कमी आहे. याशिवाय त्यावर चढून दुरुस्तीचे काम करणे ही सोपे जाणार आहे. तर दुसरीकडे पोलची उंची असल्याने लोंबकळत्या विद्युत वाहक तारांचा धोका ही कमी होणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर होणार
वसई विरार शहरात दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थितीची समस्या उद्धभवते. या वीज व्यवस्थेवरही परिणाम होत असतो. विशेषतः खारटन व पाणी साचलेल्या ठिकाणी वीज वितरण व्यवस्था कोलमडून पडते तेव्हा त्याठिकाणी दुरुस्ती करताना अडचणी येतात. मोनोपोलमुळे तांत्रिक अडचणी कमी होण्याची शक्यता आहे. आणि जरी एखादा बिघाड झाला तरीही तेथे जाऊन ते पूर्वी पेक्षा अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतील असे महावितरणने सांगितले आहे.