वसई: आगामी पालघर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. पालघर मतदारसंघात निवडणुकीच्या कामासाठी साडेआठशेहून अधिक वाहनांची मागणी करण्यात आली आहे. परिवहन विभागाकडून मागणी केलेल्या वाहनांची तपासणी करून ती उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
२० मे रोजी पालघर लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. असे असले, तरी आतापासूनच या निवडणुकीची जोरदार तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. निवडणुकीच्या शासकीय कामकाजासाठी मोठ्या संख्येने वाहनांची आवश्यकता असते. त्यानुसार नियोजन करण्याचे काम सुरू आहे.
पालघरमध्ये २८२ झोनमधील २ हजार २६३ इतक्या मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त केलेले अधिकारी-कर्मचारी, ई.व्ही.एम यंत्रणा यांची मतदान केंद्रावर ने आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली जाणार आहे. त्यांच्यासाठी जवळपास साडेआठशेहून अधिक वाहने सज्ज ठेवली जाणार आहेत. यात बस, मिनी बस, जीप, व अन्य गाड्या यांचा समावेश आहे.
यात ३८९ बसेस, ११८ जीप, २८२ चारचाकी अशा एकूण ६७१ वाहने व ४ बोटी यांचा समावेश आहे. त्यासोबत ३६ बसेस २८ बस ४ बोटी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अशी एकूण ८६१ वाहनांची मागणी वसईच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात करण्यात आली असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.
परिवहन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र, वाहनाचे आर.सी. पुस्तक, वाहनाचा विमा, वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र, कर भरल्याची पावती, व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना, चालकाचा परवाना, पीयूसी अशा सर्व बाबी तपासणी करून वाहने उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी लागणाऱ्या वाहनांच्या संदर्भात परिवहन कार्यालयात मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार वाहनांच्या सर्व बाबी तपासून वाहने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. – दशरथ वाघुले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वसई
अशी आहे वाहनांची सुविधा
मतदारसंघ वाहन संख्या
डहाणू १२८ – ११०
विक्रमगड १२९- १३४
पालघर १३०- १४०
बोईसर १३१- १३९
नालासोपारा १३२- १७८
वसई १३३ – १६०