वसई : वर्सोवा खाडीवरील पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात असले तरी उद्घाटनाचा २० फेब्रुवारीचा मुहूर्त लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. पुढील आठवडय़ात होणाऱ्या आढावा बैठकीत पूल सुरू होण्याची तारीख निश्चित होणार आहे. दरम्यान पुढील काही दिवसांत सुरत-ठाणे ही पहिली मार्गिका खुली केली जाईल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सांगितले.
मुंबई आणि गुजरातला जोडण्यासाठी घोडबंदर येथील वर्सोवा खाडीवर पूल तयार करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ वर हा सव्वा दोन किलोमीटर लांबीचा पूल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे बांधला जात आहे. या पुलाचे काम फेब्रुवारी २०२१ रोजी पूर्ण करण्यात येणार होते. मात्र सुरुवातीला या पुलाचे काम अगदी संथ गतीने सुरू होते. त्यामुळे या कामाला ३० जून २०२२ पर्यंत मुदत वाढही देण्यात आली होती. त्यातच दोन वर्षे करोनाचे संकट उद्भवले आणि या पुलाचे काम आणखीनच लांबणीवर पडले होते. या नवीन पुलाच्या पहिल्या टप्प्याचे काम २० फेब्रुवारी रोजी पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जाहीर केले होते.
पुलाचे काम प्रगतिपथावर असले तरी ते पूर्ण झालेले नाही. त्यामुळे उद्घाटनाचा २० फेब्रुवारीचा मुहूर्त चुकणार आहे. पहिल्या टप्प्यात सुरत ते ठाणे ही मार्गिका सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचे काम प्रगतिपथावर आहे. पुढील आठवडय़ात कामासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली असून त्यानंतर पूल कधी सुरू होणार ते जाहीर करण्यात येईल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक मुकुंदा अत्तरदे यांनी सांगितले. पहिल्या मार्गिकेचे बहुतांश काम पूर्ण झाले असून लवकरच तो खुला केला जाईल. त्याला विलंब लागणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नवीन पूल कसा?
भाईंदर खाडीवर पहिला पूल १९६८ मध्ये बांधण्यात आला होता. हा पूल आताच कमकुवत झाला आहे. त्यामुळे नवीन पुलाची निर्मिती करण्यात येत आहे. जुन्या वर्सोवा पुलाच्या शेजारी नवीन वर्सोवा पूल तयार करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे करण्यात येत आहे. हा पूल ४ मार्गिकांचा आहे. जानेवारी २०१८ मध्ये या पुलाच्या कामाला सुरुवात झाली होती. या पुलाच्या निर्मितीसाठी २४७ कोटी रुपये खर्च आला आहे. त्याची लांबी २.२५ किलोमीटर एवढी आहे.