विरार : करोनानंतर आलेल्या म्युकरमायकोसीस आजाराचे रुग्ण वसई विरारमध्ये आढळत आहेत. सध्या पालिकेच्या आकडेवारीनुसार शहरात आठ रुग्ण आढळून आले आहेत. वाढती रुग्णाची संख्या पाहता पालिकेने वसईच्या कौल सीटी रुग्णालयात या आजारावर उपचार करण्याची सोय केली आहे. त्यासाठी ४५ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात मोफत उपचाराची सुविधा पालिकेने दिली आहे.
करोना दुसऱ्या लाटेनंतर आलेल्या म्युकरमायकोसीस आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. या आजारासाठी रुग्णांना लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत तसेच विविध तज्ज्ञ डॉक्टरांची गरज लागते. त्याच बरोबर औषधे, विविध चाचण्या अतिशय महागड्या आहेत.
यामुळे रुग्णांना यावर उपचार करणे अधिक खर्चीक आहे. म्हणून पालिकेने नागरिकांना दिलासा देत पालिकेच्या कौल सिटी या रुग्णालयात मोफत उपचाराची सोय केली आहे. यासाठी कान, नाक, घसा आणि डोळ्यांच्या तज्ञ डॉक्टरांचा समूह तैनात केला आहे. सध्या शहरात ८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी राजेश चौहान यांनी दिली आहे.
शासनाने म्युकरमायकोसीसवरील उपचार महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून मोफत केले आहेत. पण सध्या जिल्ह्यात एकही रुग्णालय या योजनेतून सेवा देत नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयाचे लाखोंचे देयक भरावी लागत आहेत. या उपचारासाठी जिल्ह्यातील एकाही खासगी रुग्णालय सक्षम नसल्याने या योजनेंतर्गत कुठलेही रुग्णालय नाही. जर रुग्णांना मदत लागल्यास त्यांना ठाणे अथवा घोडबंदर या ठिकाणी उपचार केले जातील. -डॉ. वैभव गायकवाड, योजना अधिकारी