वसई : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मालजीपाडा, ससूनवघर परिसरात आरएमसी वाहतूक करणारी वाहने ही विरुद्ध दिशेने वाहतूक करू लागल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. अशा विरुद्ध दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महामार्ग वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत ७० आरएमसी वाहनांवर कारवाई केली आहे.
वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढू लागले आहे. याशिवाय विकासाची कामे ही या भागात वेगाने सुरू झाली आहे. त्यामुळे सिमेंट काँक्रिटीच्या रेडिमिक्सच्या मालाची मागणी ही वाढली आहे. याच अनुषंगाने मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत विविध ठिकाणी रेडिमिक्स सिमेंट प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या कारखान्यातून दररोज अवजड वाहने, मिक्सर तसेच वाळूची वाहने ये-जा करत असतात. अगदी महामार्गाला लागूनच सिमेंट कारखाने असल्याने आरएमसी वाहने विरुद्ध दिशेने प्रवास करू लागली आहे. दररोज आरएमसी वाहतूक करणारी वाहने सर्वाधिक विरुद्ध दिशेने प्रवास करताना दिसून येत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. नुकताच मागील काही दिवसांपूर्वी ससूनवघर येथील किनारा हॉटेल जवळ विरुद्ध दिशेने वाहतूक करणाऱ्या आरएमसी वाहनाची समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक लागून अपघात झाला होता. यात जस्मीतसिंग अरविंदसिंग अरोरा (२९) हा दुचाकी स्वार जखमी झाला होता.
आरएमसी वाहन चालक कोणत्याही प्रकारचे नियम न पाळतात भर धाव वेगाने वाहने चालविली जात असल्याची तक्रार ही अनेकदा नागरिकांनी केली होती. विरुद्ध दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात चिंचोटी महामार्ग पोलीसांनी कारवाई सुरू केली असून आतापर्यंत ७० आरएमसी वाहनधारकांच्या विरोधात कारवाई करून दंड आकारला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ( वाहतूक) अरविंद चौधरी यांनी सांगितले आहे.
आरएमसी चालकांची बैठक
विरुद्ध दिशेने येणाऱ्या आरएमसी वाहनांवर कारवाई मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आरएमसी वाहतूक करणारी वाहने सर्वाधिक विरुद्ध दिशेने प्रवास करताना आढळून येत असतात याबाबत आम्ही आरएमसी प्रकल्प वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची बैठक घेतली होती. मात्र महामार्ग प्राधिकरणाने मधील छेद रस्ते बंद केल्याने अडचणी येत असल्याचे आरएमसी वाहतूक दारांनी सांगितले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
सरळ मार्गी प्रवासाचा कंटाळा
प्रत्येक वाहनांना ये जा करण्यासाठी मालजीपाडा, नायगाव, ससूनवघर अशा ठिकाणी उड्डाणपूल तयार केले आहेत. मात्र त्याला वळसा घालून प्रवास करण्याचा कंटाळा आरएमसी व इतर मातीभराव करणारे वाहनचालक करतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे