वसई-विरार महापालिकेकडेच कोणत्याही उद्यानांची तपशील नाही

विरार :  वसई-विरार महानगरपालिका उद्यानांच्या बाबतीत अजूनही उदासीन आहे. विरार पूर्व येथे मागील चार वर्षांपासून वनस्पती उद्यान बनलेच नाही. पालिकेने केवळ या ठिकाणी उद्घाटन करून सोडले आहे. पण  हे उद्यान विकसित करण्यासाठी अजूनही मुहूर्त सापडला नाही. मागील चार वर्षांपासून हे उद्यान विकासाच्या प्रतीक्षेत आहे. वसई-विरार महानगरपालिकेतर्फे शहरात विविध ठिकाणी उद्याने विकसित केली जाणार होती. त्यासाठी उद्यान आरक्षित जागा पालिकेने हस्तांतरित करून त्यावर विविध उद्याने उभारण्याचे सांगितले होते. त्यानुसार विरार पूर्व मनवेल पाडा विभागातील नानानानी पार्क परिसरात सन २०१७ मध्ये पालिकेकडून वनस्पती उद्यान बांधण्याचे ठरवले होते. यासाठी पालिकेने या उद्यानाचा शिलान्याससुध्दा केला होता. पण मागील चार वर्षांत केवळ या उद्यानाचे प्रवेशद्वारच आणि कुंपण पालिकेने बांधले आहे. पण मागील चार वर्षांत पालिकेने यावर कोणतेही काम केले नाही. यामुळे नागरिकांत मोठी नाराजी पसरत आहे. हे उद्यान कधी आणि केव्हा पूर्ण होईल असा सवाल परिसरातील नागरिक विचारत आहेत.

वसई-विरार महानगरपालिकेकडे १४० उद्याने आहेत. सध्या या उद्यानाला कोणीही वाली नाही. पालिकेकडून या उद्यानाची कोणतीही देखभाल केली जात नाही. यामुळे ही उद्याने भकास होत चालली आहेत.  उद्यानात साफसफाई होत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.  तण, आणि झाडे झुडपे वाढून जंगलाचे स्वरूप या उद्यानात तयार झाले आहे. यामुळे जनावरांची भीती वाढली आहे. अनेक रोपटी, फुलांची झाडे मारून पडली आहेत,  तर अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडून आहेत. शोभेच्या झाडांची छाटणी आणि खतपाणी न मिळाल्याने अनेक ठिकाणी ही झाडे मेली आहेत. यामुळे उद्यानात कमालीची अस्वच्छता आहे. असे असतानाही पालिका मात्र कोणतेही लक्ष देत नाही. त्यातच नव्याने तयार होणाऱ्या कोणत्याही उद्यानांचे तपशील पालिकेकडे उपलब्ध नाही. एकीकडे पालिका हरित वसई आणि सुंदर वसईचे दाखले देत असताना पालिकेच्या अखत्यारीतील उद्याने अपूर्ण अवस्थेत असून ती भकास होत चालली आहेत.