सुहास बिऱ्हाडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई : मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिकांपुढे ४७७ आरोग्यवर्धिनी केंद्रनिर्मितीचे आव्हान असताना आता त्यात १४१ ‘आपला दवाखाना’ उभारण्याच्या लक्ष्याची भर पडली आहे. राज्य शासनाने अध्यादेश काढून हे नवे उद्दिष्ट दिले आहे. आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्दिष्ट पूर्ण झाले नसताना हे नवे लक्ष्य देण्यात आल्याने ते गाठताना महापालिकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

राज्य शासनाने मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिकांना सप्टेंबरमध्ये ४७७ आरोग्यवर्धिनी केंद्रे उभारण्याचे उद्दिष्ट दिले होते. यासाठी जागा शोधणे, डॉक्टरांच्या नियुक्त्या करणे आदी दिव्ये महापालिकांना पार पाडावी लागत आहेत. अनेक अडचणींमुळे आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या निर्मितीसाठी महापालिकांना अपयश येत असताना दुसरीकडे शासनाने ‘आपला दवाखाना’ उभारण्याचे नवे लक्ष्य दिले आहे.

हेही वाचा >>> विरार मधील जात पंचायत प्रकरण: पंचायतीने आकारलेली दंडाची रक्कम परत करण्याची मागणी

मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिकांना १४१ ‘आपला दवाखाना’ उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामध्ये मुंबई १०, ठाणे १२, नवी मुंबई १७, कल्याण डोंबिवली ५९, भिवंडी निजामपूर १०, वसई विरार महापालिका १५, पनवेल २ आणि मीरा भाईंदर ११ असे आपला दवाखाना उभारण्याचे उद्दिष्ट दिले आहे. या १४१ ‘आपला दवाखाना’पैकी सध्या केवळ १० दवाखाने चालू आहेत. आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्दिष्ट गाठताना महापालिकांच्या नाकीनऊ आले असताना ‘आपला दवाखाना’ लादला जात असल्याबद्दल नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे. शासनाच्या घोषणेमुळे आरोग्यवर्धिनी केंद्र आणि आपला दवाखाना असे दुहेरी उद्दिष्ट गाठण्याचे आव्हान महापालिकांपुढे आहे.

आरोग्यवर्धिनी केंद्रांसाठी कमी वेतनात काम करण्यास डॉक्टर तयार नसतात, तर दुसरीकडे दवाखाना उभारण्यासाठी जागाही मिळत नसल्याचा प्रश्न आहे. त्यामुळे महापालिकांना खासगी जागा भाडय़ाने घेण्यासाठी जाहिराती द्याव्या लागत आहेत. मग ही केंद्रे कमी कालावधीत पूर्ण कशी होतील, असा सवाल महापालिकांनी उपस्थित केला आहे.

राज्य शासनाने राज्यात ७०० ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. ‘आपला दवाखाना’ राज्य शासनाच्या अनुदानातून सुरू करण्यात येणार आहे.

राज्यात ७०० दवाखान्यांचे उद्दिष्ट

राज्यात पहिल्या टप्प्यात एकूण ७०० ‘आपला दवाखाने’ उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ग्रामीण भागांत ३०८ चे उद्दिष्ट असून, त्यापैकी २९७ पूर्ण झाले आहेत. मात्र, शहरी भागांत ‘आपला दवाखाना’ उभारण्यात फारसे यश आलेले नाही. शहरी भागातील महापालिका क्षेत्रात ३९२ दवाखान्यांचे उद्दिष्ट असून, त्यापैकी केवळ ५० पूर्ण झाले आहेत. महापालिका क्षेत्रातील आपला दवाखान्याचे पूर्ण झालेले उद्दिष्ट केवळ १३ टक्के आहे.

अडचणी काय?

आरोग्यवर्धिनी केंद्रांसाठी कमी वेतनात काम करण्यास डॉक्टर तयार होत नसल्याचा प्रश्न असताना आता ‘आपला दवाखाना’ उभारण्यासाठी जागा मिळत नसल्याची अडचण महापालिकांपुढे आहे. परिणामी, महापालिकांना खासगी जागा भाडेतत्त्वावर घेण्यासाठी जाहिराती द्याव्या लागत आहेत.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal corporation facing challenges to open 141 aapla dawakhana zws