वसई, विरार, बोळींजमध्ये  पूर्ण क्षमतेने सेवा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विरार : वसई-विरार शहरात करोना रुग्णाचा आलेख वाढत आहे. यामुळे पालिकेने आपली तीनही रुग्णालये पूर्ण  क्षमतेने सुरू केली आहेत. यात वसईत वरुण इंडस्ट्रीज, विरारमध्ये चंदनसार आणि बोळींज येथील रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहेत. वसई-विरारमध्ये पुन्हा करोना रुग्णाच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. मंगळवारी शहरात ४५० रुग्ण आढळले, तर बुधवारीसुद्धा मोठय़ा प्रमाणत रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे पालिकेने आपल्या आरोग्य यंत्रणा वाढविण्यावर भर दिला आहे. पालिकेने वसईतील वरुण इंडस्ट्रीज येथे १२०० खाटांचे रुग्णालय सुरू केले आहे. यात २४० प्राणवायू सुविधा असलेल्या खाटा उपलब्ध केल्या आहेत. तर १० कृत्रिम श्वनसयंत्रणेच्या (व्हेंटिलेटर) खाटा आहेत. तर चंदनसार येथील रुग्णालयात १५० अतिदक्षता सुविधा असलेल्या खाटा उपलब्ध केल्या आहेत. विरार पश्चिम येथील बोळींज रुग्णालयात लहान मुलांसाठी तसेच इतर रुग्णांसाठी १२० खाटा उपलब्ध केल्या आहेत. यात १० कृत्रिम श्वसनयंत्रणेच्या खाटा  आहेत. त्याचप्रमाणे सोपारा येथील समेळ पाडा परिसरात १५० खाटांचे रुग्णालय तयार करण्यात येत आहे. मागील लाटेत रुग्णांना प्राणवायूची मोठी कमतरता जाणवली होती. यामुळे पालिकेने आठ लहान आणि चार मोठे प्राणवायूचे प्रकल्प उभारले आहेत.

त्याचप्रमाणे पालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रावर चाचणीची सुविधा उलब्ध केल्याची माहिती साथ रोग प्रतिबंध विभागाच्या प्रमुख डॉ. स्मिता वाघमारे यांनी दिली आहे. पालिकेकडून प्रतिबंधात्मक क्षेत्रात वाढ करण्यात येणार आहे. सध्या पालिकेच्या क्षेत्रात २३५ प्रतिबंध क्षेत्र कार्यरत आहेत. यामुळे वसई विरारमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत असताना पालिका तिसऱ्या लाटेसाठी सज्ज झाली आहे. तसेच नागरिकांना करोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal corporation launches hospitals ysh